esakal | मनाचिये वारी : वारी चुको न दे हरी!
sakal

बोलून बातमी शोधा

Dnyaneshwar and Tukaram

मनाचिये वारी : वारी चुको न दे हरी!

sakal_logo
By
शंकर टेमघरे

वाखरी-पंढरपूर हे हाकेच्या अंतरावर. दरवर्षी या वाटचालीत सर्व संतांच्या पालख्या पंढरीत प्रवेश करतात. अठरा दिवसांची वाटचाल करीत आलेल्या वारकऱ्यांना पंढरीत प्रवेश केल्यानंतर आनंदाचे भरते येते. आपली परंपरेची वारी विठुरायाच्या चरणी रुजू झाली, हा भाव त्यांच्या मनी असतो. गेल्या वर्षी कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे एसटी बसने पादुका वीस वारकऱ्यांसोबत पालखी सोहळे वाखरीत आले. त्यानंतर थेट बसने पंढरीत आपापल्या मंदिरांमध्ये विसावल्या होत्या. (Shankar Temghare Writes about Aashadhi Wari)

यंदा कोरोनाचा प्रभाव कमी होता. मात्र, तो वाढू नये यासाठी सरकारने पायी वारी रद्द केली. यंदा पालखी सोहळ्यांचे परंपरेप्रमाणे प्रस्थान झाले. त्यानंतर मंदिरात सतरा दिवस पादुका आजोळघरी राहिल्या. दशमीला सकाळी नऊ वाजता माउलींच्या पादुका घेऊन पंढरीकडे मार्गस्थ झाले. त्यावेळी आळंदीकरांचे मन भरून आले. माउली आळंदीतून निघाल्यापासून ते वाखरीत पोहोचेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा भाविक माउलींची वाट पाहात होते. पुणे शहरातून पोलिसांच्या ताफ्यात माउलींना वाट करून देण्यात आली. माउलींच्या मार्गावर सकाळपासून भाविक वाट पाहत होते. कडेकोट बंदोबस्तामुळे बस कुठेही थांबली नाही. फुलांनी सजविलेली बस जाताना माउलींच्या पादुकांना भाविकांनी हात जोडून दर्शन घेतले. पुणे सोडल्यानंतर माउलींची बस दिवे घाट आली. सुनासुना असलेल्या दिवे घाटाला माउलींच्या सहवासाने चैतन्य संचारले होते. रस्त्याच्या कडेला भाविक थांबून राहिले होते. सासवडमध्येही तशीच स्थिती होती.

हेही वाचा: Cororna Update : राज्यात दिवसभरात 6,017 नवीन रुग्णांची नोंद

जेजुरीकरांनी दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे माउलींच्या बसवर भंडाऱ्याची उधळण केली. ‘माउली-माउली’ नामाने अवघी वाट भंडाऱ्याने भरून गेली. वाल्हे, लोणंदमध्ये भाविक रस्त्यांवर नतमस्तक झाले. फलटणजवळ बसवारीने विसावा घेतला. शाही थाटात स्वागत होत असलेल्या फलटणनगरीतही माउलींचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. फलटणमध्ये सुमारे दोन किलोमीटर तोबा गर्दी होती. बरड, नातेपुते, वेळापूर, भंडीशेगावमध्ये फटाक्यांची आतषबाजीने माउलींचे स्वागत केले. यंदा वारी नसल्याने वारकरी भावुक झाले होते, तर माउली ज्या-ज्या गावातून जाते, त्यांचीही तीच अवस्था होती. माउलींवर असलेली अतूट श्रद्धा, भक्तिभाव आज पालखी मार्गावर दिसून आला. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पायी वारी रद्द झाली. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वारकरी घरी बसून होते. माउलींच्या बसचा वेग कमी झाला की बसला हात लावण्यासाठी एकच झुंबड उडत होती. गावोगावी गर्दीतून वाट काढीत माउलींची बस वाखरीत दाखल झाली. वाखरी ते इसबावी पायी वारीला परवानगी दिल्याने या वाटेने चालताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद लपत नव्हता. पण, दरवर्षी या वाटचालीत असलेले ऐश्‍वर्य आज दिसत नव्हते. कोरोनामुळे वारी रद्द झाली.

सरकारच्या निर्णयाचे वारकऱ्यांनी तंतोतंत पालन केले. संतांची शिकवण वारकऱ्यांनी आचरणात आणली, त्यासाठी वारकऱ्यांना सलामच करावा लागेल. ‘देह जावो अथवा राहो’ अशी भावना जगणाऱ्या वारकऱ्यांनी सामाजिक भान राखले. लाखो वारकऱ्यांनी ‘ठायीच बैसोनी करा एक चित्त’ हीच साधना केली. लाखो वारीतील आनंदाला मुकले. त्यामुळे विठ्ठलाकडे एकच मागणं आहे, यापुढे वारकऱ्यांच्या श्रद्धेचा अंत पाहावा लागेल, अशी स्थिती आणू नको. कोरोना असो वा आणखी काही स्थिती असो, त्यांची वारी चुको न दे हरी.

loading image