esakal | मनाचिये वारी : दासाचाही दास व्हावे...!
sakal

बोलून बातमी शोधा

Vittal Rukmini

मनाचिये वारी : दासाचाही दास व्हावे...!

sakal_logo
By
शंकर टेमघरे

फलटणच्या विस्तीर्ण तळावर वाढीव तिथी आली, की माऊलींच्या सोहळ्याचा मुक्काम वाढतो. त्यावेळी परिसरातील भाविकांनाही ही पर्वणीच असते. फलटणमध्ये पालखीचा मुक्काम दोन दिवस असला, की पश्चिम महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने येथे माऊलींच्या दर्शनाला येतात. रात्रंदिवस दर्शन सुरू असले, तरी भाविकांची रांग हटत नाही. मोठ्या तळामुळे वारकऱ्यांनाही येथे चांगली सोय होते. प्रशासनही येथे काही कमी पडू देत नाही. पंढरीच्या या वाटेने चालणारा प्रत्येक जण वारकरीच. वारकरी दिंडीत भिशी भरून अठरा दिवसांची आपली व्यवस्था करून राहतात. पण, ज्यांना दिंडीत पैसे देणे शक्य नाही, पण वारीत चालण्याची इच्छा आहे, असे भाविक सोहळ्याच्या पुढे किंवा मागे चालतात. त्यांच्या डोक्यावर कपड्याची पिशवी असते. जिथे मिळेल तिथे जेवण, गावातील मंदिरात किंवा कोणाच्या ओट्याच्या ओसरीला झोपायचे. गेल्या काही वर्षांपासून अशा वारकऱ्यांची संख्या वाढत आहे.

दिंडीतील वारकरी वाटचालीत चालताना कोणी वाटप करीत असेल, तर ते घेत नाहीत. त्यांना दिंडीत आवश्यक त्या सुविधा असतात. दिंडीत चालणारे वारकरी संप्रदायाचे अलिखित नियम पाळतात. अगदी दिंडीत चालताना एका रांगेत चालणारे चार वारकरी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसांपर्यंत सारखेच असतात. अशा शिस्तीचे पालन करणारे असंख्य दिंड्या आहेत. दिंडीतील नियम वारकरी तंतोतंत पाळतात. दिवसभर चालून गेल्यावर गरमागरम जेवण, झोपण्यासाठी तंबूची सोय तयार असते. त्यामुळे दिंडीतील वारकरी अन्यत्र जेवणासाठी जाताना बहुधा दिसत नाहीत. पण, गावोगावी घरोघरी जे अन्नदान केले जाते, तेथे ही मुक्तवारी करणाऱ्यांसाठी असते. काही दिंड्यांना स्थानिक ठिकाणी पंगत असते, पण ही अपवादानेच.

हेही वाचा: राज्याला दिलासा, कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट!

ग्रामस्थांच्यादृष्टिने दिंडीतून चालणारे आणि मुक्तपणे चालणारे वारकरीच. त्यामुळे ते सेवा समजून अन्नदान करतात. पुण्यापाठोपाठ फलटणमध्ये अन्नदान केले जाते. वारकरी वाढीव दिवशी दिवसभर विश्रांती घेणेच पसंत करतात. फलटणकर मात्र, माऊलींच्या सोहळ्याच्या मुक्कामाचे सेवेतून सोने करून घेतात. शहरात मंगलमय वातावरण नांदत असते. वारीत आलेले वारकरीही येथील ऐतिहासिक राम मंदिराच्या दर्शनासाठी गर्दी करीत असतात. संस्थानिकांच्या स्वागताने अवघे वैष्णव भारावून जातात.

गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची राहण्याची, जेवणाची, मसाज, केशकर्तनालय, चपला शिवणे असे अनेक उपक्रम राबवून आम्ही त्यांच्या सेवेचा लाभ घेत असतो. पण, गेल्या दोन वर्षांपासून ही सेवा वारी रद्द झाल्याने खंडित झाली आहे. वारी नसल्याने उदास वातावरण आहे. यातून लवकर सुटका होऊन वारी पुन्हा पूर्ववत सुरू व्हावी, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना.

- किशोरसिंह नाईक निंबाळकर, अध्यक्ष शंकर व्यापारी युवक मंडळ, फलटण

loading image