पवार, गडकरी एकाच व्यासपीठावर; 'या' अडचणींवर मात करण्यासाठी एकत्र

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

  • नागरी बॅंकांच्या अडचणींवर मात करण्यासाठी कृती आराखडा करणार
  • मुंबईत 18 डिसेंबरला नागरी बॅंकांची एकदिवसीय परिषद
  • शरद पवार, नितीन गडकरी उपस्थित राहणार

पुणे : नागरी सहकारी बॅंकांसमोरील संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. नागरी बॅंकांवरील दुहेरी नियंत्रण, नागरी बॅंकांचे खासगीकरण यासह विविध मुद्यांवर उपाययोजना करण्याबाबत आराखडा तयार करण्यात येणार आहे. या संदर्भात मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात 18 डिसेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत नागरी सहकारी बॅंकांची एकदिवसीय परिषद होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप   

या परिषदेत नागरी बॅंकांवर दुहेरी नियंत्रण असावे की नाही याबाबत चर्चा होईल. नागरी बॅंकांना "रिस्क बेस' विमा हप्ता लागू करण्याच्या रिझर्व्ह बॅंकेच्या शिफारशीबाबत बॅंकिंग क्षेत्राकडून भूमिका ठरविण्यात येईल. मोठ्या नागरी बॅंकांचे खासगी बॅंकामध्ये रूपांतर करण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने सुचविलेल्या नियमांबाबत बॅंकांची भूमिका स्पष्ट करण्यात येईल. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने नागरी बॅंकांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईबाबत नागरी बॅंकांची भूमिका निश्‍चित करण्यात येणार आहे. वैधानिक लेखापरीक्षक आणि रिझर्व बॅंकेचे तपासणी अधिकारी यांच्यातील अनुत्पादक कर्जाबाबत (एनपीए) मतभेद असल्यास त्याबाबत निर्णय घेण्यासाठी अपीलीय प्राधिकरणाची निर्मिती करण्यात यावी.

अजित पवार म्हणतात एकमत होत नसेल तर सर्वांनी राजीनामे द्या 

अडचणीतील बॅंकांचे संचालक मंडळ बरखास्त न करता रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने निरीक्षक नेमण्यात यावा. बॅंकेकडून नागरी बॅंकांना देण्यात येत असलेल्या सापत्न वागणुकीविरोधात लढा उभारणे, बॅंकिंग क्षेत्राला जाणीवपूर्वक बदनाम करणाऱ्या स्पर्धकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे, बॅंकिंग क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा बसविणे, नागरी बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेऐवजी नाबार्ड अथवा इतर संस्थेचे नियंत्रण ठेवण्याबाबत मागणी करण्यात येणार आहे.

शिवसेना पुन्हा भाजपसोबत; केले बाजूने मतदान

शरद पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन
मुंबईतील फोर्ट येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे बुधवारी (ता. 18 परिषद) नागरी बॅंकांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्‌घाटन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होईल. तर, सायंकाळी पाच वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमास रिझर्व्ह बॅंकेचे संचालक सतीश मराठे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्‍स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar and Nitin Gadkari on the same platform in Mumbai