पवारांना शुभेच्छा देण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांची गर्दी
मुंबई - वयाच्या अठ्ठ्याहत्तरीत चेहऱ्यावर कोणताही थकवा नाही, प्रत्येकाला हसतमुखाने व व्यक्तिगत ओळख दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सलग चार तास उभे राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवसानिमित्त आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पवारांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातून सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी व सामान्य नागरिकांनी रांगा लावल्या होत्या.
प्रत्येकाशी हस्तांदोलन करत; तर कधी पाठीवर प्रेमाने हात फिरवत पवारांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. कित्येकाने त्यांच्या सोबत उभे राहून छायाचित्रेदेखील काढून घेतली.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी खासदार पवार यांच्या आयुष्यातील घटनांचा वेध घेणारे प्रसंग छायाचित्रांद्वारे मांडण्यात आले होते. पवार यांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन "राष्ट्रवादी'च्या प्रदेश कार्यालयाकडून करण्यात आले होते.
अनेक नेत्यांची हजेरी
या वेळी अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, पी. जी. आर. सिंदिया, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, सुनील तटकरे, नवाब मलिक, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, चित्रा वाघ आदींसह अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय राजपत्रित अधिकारी आणि "एमसीए'च्या पदाधिकाऱ्यांनीही पवार यांना शुभेच्छा दिल्या.
दुष्काळग्रस्तांना मदत
पवार यांचा असा वाढदिवस आगळ्यावेगळ्या आणि अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी "चला मदतीचा हात देऊ' या उपक्रमाची सुरवात देखील पवार यांनी आज वाढदिवसाचे निमित्त साधत केली. राज्यात भीषण दुष्काळ असून, त्यामध्ये बळिराजा होरपळत असल्याने पवार यांनी आपल्या वाढदिवशी पुष्पहार, पुष्पगुच्छ किंवा भव्य कार्यक्रम, सोहळा न घेण्याचा निर्णय घेतला होता.
कार्यक्रमांसाठीचा निधी दुष्काळग्रस्तांना देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवार यांच्याकडे दुष्काळग्रस्तांसाठीच्या निधीचा धनादेश सुपूर्त केला.
|