PowerAt80: बाळासाहेब शरद पवारांना म्हणायचे 'मैद्याचं पोतं'!

Sharad_Pawar_Balasaheb_Thackeray
Sharad_Pawar_Balasaheb_Thackeray

PowerAt80: पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज ८०वा वाढदिवस. देशाच्या राजकारणातील एक मुरब्बी आणि कणखर नेतृत्व. जवळपास गेल्या ५ दशकांपासून राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा वारु चौफेर उधळणारा आणि गुणवत्तेचा अमीट ठसा उमटवणारा हा नेता. त्याच तोडीचं दुसरं नाव म्हणजे हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. या दोन्ही नेत्यांचे पक्ष, विचार आणि एकूणच राजकारण जरी वेगळं असलं तरी त्यांची मैत्री ही या सर्वांपलीकडे होती. अफाट लोकप्रियता मिळालेल्या या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीचे किस्से चर्चिले जातात. 

बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यातील मैत्री आणि शाब्दिक हल्ले संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहेत. कौटुंबिक नाती आणि राजकारण त्यांनी ज्या-त्या जागी ठेवलं. जशा निवडणुका जवळ यायच्या तसतसे या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडायच्या. बाळासाहेब आपल्या कुंचल्यातून शरद पवारांना मार्मिक अशे फटकारेही मारायचे. अनेकदा त्यांनी व्यंगचित्रांमध्ये पवारांचा 'बारामतीचा म्हमद्या', 'मैद्याचं पोतं' असा ठाकरी भाषेत उल्लेख केला आहे.  

ऑक्टोबर १९६६ मध्ये एका सायंकाळी बाळासाहेब शिवसेनेच्या मेळाव्यात भाषण देत होते. व्यंगचित्रकार ते नेता बनलेल्या बाळासाहेबांची ही पहिलीच राजकीय रॅली होती. मध्य मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आयोजित मेळाव्यात ते रोजगाराच्या शोधात देशाच्या विविध भागातून आलेल्या परप्रांतीयांवर बरसत होते. गर्दीत बसलेला एक माणूस ठाकरे यांचं भाषण अगदी मन लावून ऐकत होता. तो व्यक्ती म्हणजे शरद पवार. बारामतीतून आलेले पवार यांची आणि ठाकरे यांची विचारसरणी वेगळी होती. यशवंतराव चव्हाणांना आदर्श मानणाऱ्या तरुण शरद पवारांना ठाकरेंचे ते शब्द झेपणारे नव्हते, ते त्यांनी त्यावेळीच ओळखलं होतं. 

व्यंगचित्रकार बाळ ठाकरे आणि कॉंग्रेस कार्यकर्ते शरद पवार
शरद पवार यांनी शिवसेनेची स्थापना होण्यापूर्वी ठाकरे यांची भेट घेतली होती. खरं तर बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे एक नावाजलेलं व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या दादरमधील निवासस्थानी लोकांचं येणं-जाणं चालू असायचं. त्यावेळी बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी पाहुण्यांना भुरळ घातली. मुंबईतील कारखाने आणि गिरण्यांवर कम्युनिस्टांचे वर्चस्व हे शिवसेना आणि कॉंग्रेस दोघांसाठी मोठे आव्हान होते. याच कारणामुळे १९६०च्या उत्तरार्धात आणि १९७०च्या सुरवातीच्या काही वर्षांमध्ये कम्युनिस्टांविरोधात शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात चांगले मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते; पण शिवसेनेचा पहिला मेळावा झाला आणि या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली.

राजकीय आणि कौटुंबिक संबंध वेगवेगळे 
शिवसेना आणि कॉंग्रेसमधील फूटीचा ठाकरे आणि पवार यांच्या कौटुंबिक संबंधांवर काहीच परिणाम झाला नाही. आताही शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचा मुलगा उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविला आणि २८ नोव्हेंबर २०१९ला उद्धव यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सहकार्याने मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. तीदेखील शिवाजी पार्क येथे झालेल्या भव्य सोहळ्यात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले यात शरद पवार यांची भूमिका खूप महत्त्वाची होती. बाळासाहेब यांच्या पहिल्या मेळाव्यात शिवसेनेच्या विचारसरणीशी सहमत होता आलं नाही तरी त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, हे पवार यांनी खूप आधीच ओळखलं होतं. 

शरद पवारांना बाळासाहेब म्हणायचे...
बाळासाहेब नेहमीच शरद पवारांना 'शरद बाबू' म्हणून हाक द्यायचे. वैयक्तिक आणि राजकीय जीवन वेगळे ठेवून ते अनेकदा आपल्या भाषणांमध्ये पवारांचा उल्लेख 'मैद्याचं पोतं' असा करत. पण दोन्ही कुटुंब एकत्र जेवण करत असत आणि एकमेकांची काळजी घेत असत. जेव्हा सुप्रिया या एक वर्षाच्या होत्या, तेव्हा शरद पवार पत्नी प्रतिभाताईंना घेऊन बाळासाहेबांच्या नवीन घरी गेले होते आणि तिथं त्यांनी जेवणही केलं होतं. जेवणानंतर पवार कुटुंबासोबत पुणे जिल्ह्यातील आपल्या गावी काटेवाडीला परत निघाले. सुप्रिया खूपच लहान असल्याने रात्रीचा आणि इतक्या लांबचा प्रवास ठीक नाही, असं सांगत बाळासाहेबांनी त्यांना मुक्काम करण्यास सांगितला, पण शरद पवारांनी त्यांचं काही ऐकलं नाही आणि ते गावाकडं रवाना झाले. त्या रात्री जोपर्यंत शरद पवार कुटुंबीयांसोबत सुखरुप घरी पोहोचल्याचे फोन करून सांगितले नाही, तोपर्यंत बाळासाहेब झोपलेच नाहीत.

...जेव्हा बाळासाहेबांनी सुप्रिया सुळेंसाठी भाजपला राजी केलं
२००६ सालची गोष्ट. जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना राज्यसभेची उमेदवारी देणार असल्याचं जाहीर केलं, तेव्हा बाळासाहेबांनी पवारांचे चांगलेच कान टोचले. शरद पवारांनी बाळासाहेबांना सांगायला हवं होतं असं बाळासाहेबांना वाटलं, पण ही माहिती दुसऱ्यांकडून मिळाल्याने ते चांगले भडकले होते. 'याबाबत मला का नाही सांगितलं? जर सुप्रियाला राज्यसभेवर पाठवायचं आहे, तर मग विरोधात उमेदवारच उभा केला नसता,' असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यानंतर बाळासाहेबांनी भाजपला सुप्रियाविरोधात कोणताही उमेदवार उभा करायचा नाही, अशी ताकीद देऊन टाकली होती. सुप्रियाला मी लहानपणापासून ओळखतो. ती सहा महिन्यांची होती तेव्हापासून ती माझ्या मुलाबरोबर खेळली आहे. आणि ती राज्यसभेत बिनविरोध जाणार नाही हे मी कसं पाहू शकतो, असं बाळासाहेब म्हणाले. आणि अशा प्रकारे सुप्रिया सुळे बिनविरोध राज्यसभा खासदार बनल्या.  

पवार आणि ठाकरे कुटुंबाला जोडणारं नाव सुप्रिया सुळे
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यात पवार यांची मोठी भूमिका होती. बाळासाहेबांच्या अखेरच्या काही दिवसांतही पवार उद्धव आणि एकूणच ठाकरे कुटुंबीयांचे आधारस्तंभ बनले होते. २८ नोव्हेंबर २०१९ या दिवशी जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, त्यानंतर सुप्रिया सुळेंनी केलंलं ट्वीट पवार आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये असणारा स्नेह व्यक्त करतं. 

सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, 'माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब...! आज तुमची खूप आठवण येतेय. हे सर्व पाहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिलं. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता, आहात आणि राहाल.'

- महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com