
भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप खासदार सुजय विखे पाटील, शरद पवार यांचे नातू आणि NCP चे युवा आमदार रोहित पवार हे महाराष्टारातील युवा चेहरे 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर दिसणार आहेत.
मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात थुकरवाडीची टीम सगळ्यांचं मनोरंजन करत असते. या कार्यक्रमात मनोरंजन क्षेत्रातील मंडळी हजेरी लावतात. इतर काही क्षेत्रातील मंडळीही या मंचावर येऊन गेली आहेत. मात्र लवकरच प्रदर्शित होणाऱ्या एका एपिसोडमध्ये राजकीय हास्यकारंजे उडताना दिसणार आहेत. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातील तरुण-तडफदार नेतेमंडळी या कार्यक्रमात दिसणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप खासदार सुजय विखे पाटील, शरद पवार यांचे नातू आणि NCP चे युवा आमदार रोहित पवार हे महाराष्टारातील युवा चेहरे 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर दिसणार आहेत.
याआधी अनेकदा या कार्यक्रमात राजकारणाशी संबंधित व्यक्ती येऊन गेल्या आहेत. त्यानंतर आता पवार आणि विखे पाटील एकाच मंचावर दिसणार असल्याने राजकीय वाद आणखी वाढणार की हास्याचे कारंजे फुटणार हेच पाहायचंय. दोन्ही पक्षातील युवानेते एकमेकांवर टीका नाही पण कोपरखळी मारताना दिसतील. यावेळी पंकजा मुंडे यांनी देखील या कार्यक्रमात पती अमित पालवे यांच्याबरोबर हजेरी लावली आहे तर सुजय विखे पाटील देखील त्यांची पत्नी धनश्री विखे यांच्याबरोबर उपस्थित होते.
या मंचावर उपस्थित जोडप्यांना रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा खेळ खेळण्यासाठी सांगितलं गेलं होतं. यामध्ये एक वस्तू घड्याळही होती. आश्चर्याची बाब म्हणजे सुजय विखे यांची पत्नी आणि पंकजा मुंडे यांचे पती या दोघांनीही घड्याळावर रिंग टाकली. यावेळी पंकजा मुंडेनी रोहित पवार यांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. त्यांनी असं म्हटलं की, 'तुम्ही माझ्या घरातील सगळ्या व्यक्तींना फोडू नका.' पंकजा यांची ही कोपरखळी निश्चितच धनंजय मुंडेंवर होती.
त्यावर रोहित पवार यांनी देखील चोख उत्तर देत म्हटलं की, 'घरच्यांना माहित असतं की आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे'. तेव्हा राजकिय वर्तुळातील हे युवा चेहरे कशी धमाल मस्ती करतील हे पाहणं देखील तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे.
pankaja munde rohit pawar taunt on chala hawa yeu dya