Sharad Pawar : एक डाव राखून ठेवणारा वस्ताद! काकांना चीतपट करण्याचे पुतण्यासमोर खडतर आव्हान

Sharad Pawar, devendra Fadnavis
Sharad Pawar, devendra Fadnavis

शरद पवारांनी राजकारणातून रिटायरमेंट घेवून संपूर्ण राष्ट्रवादी आपल्या हवाली करावी, ही अजित पवारांची महत्वाकांक्षी भावना आज त्यांच्या जाहीर भाषणात प्रकट झाली. शरद पवार गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळेंकडे आपला राजकीय वारसा ट्रान्सफर करत असल्याने अजित पवार बंडखोर बनत गेले असं म्हणायला इथे वाव आहे.

त्यांचा पाहटेचा शपथविधी किंवा नंतरच नॉटरिचेबल होणं तसेच शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर अजित पवारांचे अनुमोदन हे स्पष्ट करतं. परंतु शरद पवारांना सध्या तरी निवृत्त व्हायचं नाहीय हे लक्षात घ्यायला हवं. सत्ता असो - नसो लोकांना भेटणं, लोकांनी आपल्याला भेटायला येणं अन् लोकांचा आपण नेता असणं, ही गोष्ट शरद पवारांच्या वैयक्तिक, राजकीय व सामाजिक जीवनाची संजीवनी आहे.

अजित पवारांना पक्षात असणारे शरद पवारांचे कमांडर सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड अडथळे वाटतात. ही सगळी कारणं अजित पवारांच्या भाजपला सामिल होण्यास पुरक असली तरी त्यांच्यासह इतर आमदारांच्या चौकशीच्या फायली हे देखील महत्वाचं कारण जोडता येईल.

2014ला केंद्रात भाजप सत्तेत आल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात चांगले पाय रोवले. यानंतर महाराष्ट्रातील भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बडा विरोधक हा कॉंग्रेस नव्हता तर राष्ट्रवादी होता. राष्ट्रवादीचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता बळ, सहकार क्षेत्रावर असणारी पकड अन् सरंजामदार मराठा घराण्यांची राष्ट्रवादीला असणारी ताकत ही आव्हाने फडणवीसांच्या समोर होती.

महाराष्ट्राचं राजकारण स्व मुठीत साधायचं असेल तर शरद पवारांना राजकारणातून निवृत्त करण्याचे डावपेच आखावे लागतील, असा कयास देवेंद्र फडणवीसांनी 2014 च्या केंद्रातल्या विजयानंतरच केला होता. महाराष्ट्रात भाजप सत्तेत आलं आणि 2015-16 पासून फडणवीसांनी एक आरोळी ठोकायला सुरवात केली. ती म्हणजे 'शरद पवारांच राजकारण संपलं....' अर्थात शरद पवार आता म्हातारे झाले आहेत.

त्यांचा राजकारणातील प्रभाव संपलाय, असं नँरेटीव्ह फडणवीस जाहिर भाषणातून, मुलाखतीतून सेट करु लागले. राष्ट्रवादीत अजित पवारांशी धुसफूस असणारी सरंजामदार मराठा घराणी फडणवीसांनी आपल्याकडे वळवुन घेतली. हळूहळू ते अजित पवारांशी ही संपर्क वाढवत होते.

महाराष्ट्र कायमचा काबीज ठेवायचा असेल तर 'शरद पवार' नावाचा एक नंबरचा विरोधक संपवायला हवा, ही खुणगाठ बांधून 2019 ला फडणवीसांनी तयारी केली. फडणवीसांनी आपल्या विरोधात मोर्चा उघडलाय हे शरद पवार जाणून होते. फडणवीसांची शरद पवार संपल्याची आव्हानात्मक भाषा पवारांच्या डोक्यात गेली. या इर्षेतूनच पवारांनी शिवसेनेला - कॉंग्रेस - राष्ट्रवादीला एकत्र आणत महाविकास आघाडीची स्थापना केली व फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न केला होता.

फडणवीसांचं स्वतःला 'मी तेल लावलेला पैलवान' असं म्हणणं तर शरद पवारांनी 'मी पण वस्ताद आहे' असं म्हणत राजकीय बाहूबल व्यक्त करणं हे महाराष्ट्रातल्या शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कुस्तीची जाहीर घोषणा होती. शिंदे गटाला सोबत घेत आणि आता थेट अजित पवारांनाच सत्तेत सहभागी करुन घेत शरद पवारांना जबरी छोबी पछाड मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतू शरद पवार चितपट व्हायला तयार नाहीत. ही कुस्ती बेमुदत आहे.

फडणवीस वेगवेगळे डाव मारत आहेत. परंतू त्या प्रत्येक डावाच्या तोडी शरद पवारांकडे असतील. फडातल्या प्रेक्षकांच्या शरद पवारांच्या बाजूने असणाऱ्या आरोळ्या त्यांना ताकद देणाऱ्या ठरतील. फडणवीसांना असो किंवा अजित पवारांना इतक्या सहजा सहजी शरद पवारांना राजकारणातून निवृत्त करणं जमणार नाही. ते शेवटपर्यंत राजकारणात सक्रिय राहतील.

(लेखक राज्यशास्त्राचे संशोधक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com