
Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीवरील वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, 'दोन वर्षे...'
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा पहाटेच्या शपथविधीवरुन पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. या विषयाच्या चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधान. जयंत पाटील जे बोलून गेले त्यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरमध्ये पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार बोलताना म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्ष झाली आहेत. कशाला तो विषय काढता, असे सांगत त्यांनीही या प्रश्नावर उत्तर देणे टाळलं आहे. मग त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी दोन वर्षानंतर हा विषय का उपस्थित केला? हे पवार जयंत पाटील यांना विचारणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
पहाटेच्या शपथविधीवर काय म्हणाले अजित पवार?
पहाटेचा शपथविधी ही शरद पवार यांची खेळी होती का? यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, महागाई, बेरोजगारी आणि इतर महत्त्वाच्या विषयांना बगल देण्यासाठी या चर्चा सुरू झाल्या आहेत. आपण यापुर्वीच म्हटले आहे की या सगळ्या प्रकाराविषयी मी काहीही बोलणार नाही.
पहाटेच्या शपथविधीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पहाटेच्या शपथविधीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर बोलणे टाळले. आज प्रजासत्ताक दिन असल्याने कोणतंही राजकीय वक्तव्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवार यांची खेळी असू शकते. राज्यात राष्ट्रपती राजवट होती. ती उठवणे आवश्यक होते. त्यामुळे पवार यांची ती खेळी असू शकते, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.