जाणून घ्या; शरद पवार यांचं महाराष्ट्रविषयीचं व्हिजन

Sharad-Pawar
Sharad-Pawar

महाराष्ट्र साठ वर्षांचा होत आहे. या वाटचालीत ज्या पद्धतीने महाराष्ट्र घडला, वाढला त्याबाबत विचारवंतांमध्ये मत आणि मतांतरे आहेत. पण भारतातील सर्वात उत्तम व प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख कायम आहे. ती निर्माण करताना महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेले अनेक नेते आहेत, त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. शरद पवार आणि महाराष्ट्र यांचे अतूट नाते आहे. त्यांनी महाराष्ट्र घडताना बघितला, त्यात सक्रिय योगदानही दिले. त्यांनीही संसदीय कार्याची पन्नास वर्षे पूर्ण केली. शरद पवार यांनी सकाळचे प्रतिनिधी संजय मिस्कीन यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत...

प्रश्न - पवार साहेब, महाराष्ट्र ६० वर्षांचा होतोय. या साठ वर्षांच्या वाटचालीकडे आपण कसे पाहता? 
    उत्तर : महाराष्ट्र हे सुरुवातीपासूनच एका संघर्षातून निर्माण झालेले राज्य आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. पण खरं आव्हान होतं ते या भौगोलिक आणि सामाजिक बदलाच्या राज्याला एका वाक्यात बांधणे. त्यासाठी महाराष्ट्राने स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळाची स्थापना केली. राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यानंतर वसंतराव नाईक असतील, सुधाकरराव नाईक असतील यासारख्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची एकसंधता राखण्याला प्राधान्य दिले. 
    यामागे एकच कारण होते की, कापूस विदर्भात पिकत असेल तर सूत गिरण्या मुंबईसारख्या अत्यंत दूरच्या भागांमध्ये होत्या. परिणामी मजुरांची संख्या मुंबईत वाढत होती. हे मजूर म्हणजे कोकणातील चाकरमानी. राज्यातील इतर विभागातून देखील गिरणी कामगार मुंबईत आले. त्यामुळे महाराष्ट्राची ओळख ही कामगारांचे राज्य अशीच बनली होती. या सोबतच शेती आणि सिंचनाचा विषय आणि उद्योगांच्‍या विकेंद्रीकरणाबाबत तत्कालीन राज्य सरकारने अत्यंत समर्पक अशी भूमिका घेतली. त्यातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापन झाले. 

पण हे करताना सामाजिक, औद्योगिक आणि संस्कृती या क्षेत्रात राज्याच्या नेतृत्वाचे योगदान हे महत्त्वाचे ठरले काय? 
    निश्चितच. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तत्कालीन राजकीय नेत्यांमध्ये दूरदृष्टी होती. महाराष्ट्राची माती, शेती आणि संस्कृती याबाबत या नेत्यांना प्रचंड अशी आशा आणि क्रांतीची स्पष्ट दिशा होती. त्यामुळे देशात हरित क्रांतीची सर्वाधिक प्रभावी चळवळ महाराष्ट्रात रुजली. याचे कारण महाराष्ट्रातील शेती आणि विविध विभागातील परिस्थिती. सत्तेच्या विकेंद्रीकरणासोबत विकासाचे विकेंद्रीकरण हे धोरण त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी स्वीकारले. त्यातूनच केवळ मुंबईचाच नव्हे, तर नागपूर, औरंगाबाद, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, जालना, औरंगाबाद यांसारख्या शहरांमध्ये कृषी-औद्योगिक विकासासह इतर उद्योगांची निर्मिती झाली. 

पण हे सगळं एका बाजूला असताना शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र अत्यंत प्रभावी असे काम करू शकला त्यामागे कोणती ऊर्जा होती? 
    हे अगदी खरं आहे की, शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा अत्यंत प्रभावी कामगिरी केली. राज्याला प्रगतीपथावर न्यायचे तर शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण गरजेचे आहे, हे महाराष्ट्राच्या त्याकाळातील नेत्यांनी ओळखलं होतं. त्यातूनच शैक्षणिक केंद्रे निर्माण झाली. यामध्ये पुण्यासारखे शहर असेल, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, नांदेड यासारखी विद्यापिठे असतील. केवळ या शिक्षणावरच अवलंबून न राहता कृषी आधारित शिक्षण निर्मितीला प्राधान्य देत चार कृषी महाविद्यालये निर्माण करणे ही सर्वात मोठी कामगिरी महाराष्ट्राने बजावली. त्यातूनच शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या आणि बहुजनांच्या दारापर्यंत पोचली. 

पण सध्या महाराष्ट्रातील राजकीय संकट हा फार चर्चेचा विषय बनला आहे? 
    हे खरं आहे की, सध्या कोरोनाचे महासंकट राज्यावर आहे. पण महाराष्ट्राचा राजकीय आणि सामाजिक इतिहास पाहिला तर अशावेळी राजकारण विसरून सगळे सोबत येतात. मग किल्लारीचा भूकंप असेल. मुंबईचे बॉम्बस्फोट असतील किंवा इतर कुठलीही नैसर्गिक विपरीत स्थिती असतील. राजकारण सोडून सगळे एकत्र येतात आणि संकटावर मात करतात. ही येथील संस्कृती आहे. मला वाटते की, याहीवेळी राजकारण विसरून कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनीच एकत्र यावे. 

साहेब, हे सगळं महाराष्ट्राच्या जडणघडणीतले वास्तव आहे. पण महाराष्‍ट्राचा मूळ स्वभाव वारकरी संप्रदायावर विश्वास ठेवतो. त्या सहिष्णू आणि सर्वसमावेशक विचाराला  सध्या धार्मिक कट्टरतावादाचे मोठे आव्हान आहे. या आव्हानाकडे कसे पाहता? 
    हे खरं आहे की, सध्या देशातच नव्हे तर जगभरात धार्मिक कट्टरतावादाची विचारधारा फोफावत आहे. देशातदेखील अशी विचारधारा वाढवण्याचे प्रयत्न काही समाजघटक करत आहेत. पण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर हा महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या विचारांवर विश्वास ठेवणारा आहे. घराघरांत वारकरी संप्रदायाची विचारधारा सांभाळणारा महाराष्ट्र कधीही धार्मिक कट्टरता वादाकडे जाणार नाही. आजपर्यंत तो कधी गेलेला नाही. वारकरी संप्रदाय म्हणजे सर्वसमावेशक. जातीभेद विरहित आणि मानवतेच्या नात्यातून परस्परांशी एकरूप होणारा समाज आहे. याच विश्वासाने महाराष्ट्र कधीही कट्टर धर्मांधतेच्या वाटेवर जाणार नाही. कारण सामाजिक व सामुहिक शहाणपण हे महाराष्ट्राच्या मातीतच नव्हे तर माणसाच्या मनामनात, रक्तात रूजले आहे. त्यावर माझा विश्वास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com