सामान्य कार्यकर्त्यासाठी शरद पवार पोहचले सोलापूर जिल्ह्यातील कन्हेर गावात 

सुनील राऊत 
Sunday, 19 July 2020

कार्यकर्त्यांना महत्त्व 
रमेश पाटील हे सामान्य कुटुंबातील असूनही त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी व त्यांना धीर देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे माळशिरस तालुक्‍यातील महादेव डोंगरात वसलेल्या कन्हेर गावाला आले. यातच ते कार्यकर्त्यांना किती महत्त्व देतात याचा प्रत्येय आज राज्याला आला. 

नातेपुते (सोलापूर) : सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला आधार कसा द्यावा, त्याच्या पाठीवर कशी थाप टाकावी हे फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांकडून शिकावे, असे आतापर्यंत सांगितले जात होते. त्याचाच प्रत्यय आज सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्राला आला. माळशिरस तालुक्‍यातील एक सामान्य कार्यकर्ता पवार कुटुंबियांशी एकनिष्ठ असणारे रमेश पाटील यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. आज श्री. पवार या कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासाठी थेट माळशिरस तालुक्‍यातील कन्हेर या महादेव डोंगरात वसलेल्या छोट्याश्‍या गावात दाखल झाले आणि रमेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. 
रमेश पाटील यांच्या वडिलांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले होते. रमेश पाटील यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार हे थेट कन्हेर (ता. माळशिरस) या छोट्याशा गावात आपल्या सहकाऱ्यांसह आले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय पाटील आदी मान्यवर होते. सकाळी साडेनऊ वाजता शरद पवार फलटण, नातेपुते मार्गे कन्हेर येथे आले. पाटील यांच्या वाड्यावर रमेश पाटील, चुलते अंबादास पाटील, वसंत पाटील, चंद्रकांत पाटील व सर्व कुटुंबियांशी त्यांनी संवाद साधला. वडिलांच्या वयाची चौकशी केली. शेतीविषयक गप्पा मारल्या. सर्व कुटुंबीयांनी त्यांच्या पश्‍चात चांगले राहावे, चांगली शेती करावी, असे श्री. पवार यांनी सांगितले. 
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते अक्षय भांड, गौतम माने, इंद्रजीत रुपनवर, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज खाडे, गजानन पाटील, सोमनाथ पाटील आदी उपस्थित होते. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar reached Kanher village in Solapur district for a general worker