esakal | शरद पवारांनी पुन्हा जपला सोलापूरसोबतचा ऋणानुबंध 
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

शरद पवार सोलापुरातून फोडतात कोंडी 
शरद पवार ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात. त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर व राज्यपातळीवर गाजत असलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन कोंडी फोडत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. जुलैमध्ये झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर शरद पवारांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर पहिली प्रतिक्रिया दिली होती. आजच्या दौऱ्यातही शरद पवारांनी मराठा आरक्षणावर दोन छत्रपतींनी काय करावे? सुशांतसिंह प्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट या प्रश्नांवर शरद पवारांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. पवार सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. 

शरद पवारांनी पुन्हा जपला सोलापूरसोबतचा ऋणानुबंध 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक जडणघडणीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा खूप मोठा वाटा आहे. शरद पवारांच्या आयुष्यातले पहिले पालकमंत्रीपद त्यांना सोलापूर जिल्ह्याचे मिळाले होते. तेव्हापासून सुरु झालेला सोलापूर जिल्हा आणि शरद पवार हा ऋणानुबंध वारंवार जिल्ह्याने अनुभवला आहे. आजही हा ऋणानुबंध सोलापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा अनुभवायला आहे. कोरोनाच्या दहशतीत भलेभले दिग्गज नेते अज्ञातवासात गेले असताना वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचे असलेला ऋणानुबंध जपला आहे. 

यापूर्वी जुलैमध्ये झालेल्या सोलापूर दौऱ्यात त्यांनी माळशिरस तालुक्‍यातील कन्हेर येथील रमेश पाटील यांच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी सांत्वनपर भेट दिली. त्यानंतर सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेत माजी आमदार युन्नुसभाइ भाई शेख यांच्या घरी ही सांत्वनपर भेट दिली होती. पवारांनी ज्या काळात सोलापूर आणि पंढरपूरचा दौरा केला, त्या काळात त्या ठिकाणी कोरोनाने उच्छाद मांडलेला आहे, हे विशेष. कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिक व इतर आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी मिडिसिव्हिर इंजेक्‍शन प्रभावी ठरते. या इंजेक्‍शनचा बाजारात तुटवडा असल्याने शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यासाठी 80 हून अधिक इंजेक्‍शन उपलब्ध करून दिले होती. जुलैमध्ये झालेल्या या दौऱ्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच शरद पवार आज पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याच्या दौरा केला. 

सोलापूरच्या सहकारातील दिग्गज नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा कोरोनामुळे निधन झाले. सुधाकरपंत परिचारक आणि शरद पवार हे सोलापूरच्या आणि राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे समीकरण. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांनी तत्कालीन महायुतीचा झेंडा खांद्यावर घेतला आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. प्रशांत परिचारक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 2014 ची विधानसभा निवडणूक पंढरपुरमधून लढविली. यात त्यांचा पराभव झाला परंतु त्यानंतर त्यांनी 2016 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा पराभव घडविला. सोलापूर जिल्ह्याचे राजकारण आजही परिचारक या कुटुंबाशी फिरत असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात परिचारक परिवाराची मोठे महत्त्व आहे. शरद पवारांनी आजच्या सांत्वनपर भेटीतून ऋणानुबंधाचा संदेश योग्य वेळी दिला. 

आजच्या दौऱ्यात पवारांनी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील व प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रामदास महाराज कैकाडी यांच्या कुटुंबाचीही सांत्वनपर भेट घेतली. या भेटीतून त्यांनी आपण आजही सोलापूर जिल्ह्यात सोबत असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला. आहे 2009 ते 2014 या कालावधीत शरद पवार यांनी लोकसभेत माढा लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले होते. माढा मतदारसंघाची 2019 ची लोकसभा निवडणूक शरद पवारांसाठी प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव झाला. आपल्या उमेदवाराचा पराभव होऊन देखील शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यावरील प्रेम तसूभरही कमी होऊ दिले नाही. आजही सोलापूरकरांच्या सुख-दुःखात शरद पवार आवर्जून धावून येतात. सोलापूर जिल्ह्यात सध्या पंढरपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवारांनी आज पंढरपूर शहर व तालुक्‍यात केलेला दौरा अनेकांना थक्क करून गेला आहे. शरद पवारांची दुर्दम्य इच्छाशक्ती व धाडसाचे कौतुक जिल्ह्याच्या राजकारणात, समाजकारणात चर्चेचा विषय झाले आहे.