
Sharad Pawar on Kolhapur : ‘त्या’ गोष्टींना सरकार प्रोत्साहन देतोय, कोल्हापुरातील प्रकारावरुन शरद पवारांचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर : कोल्हापूरला कुणीतरी मोबाईलवर पाठविलेला मेसेज चुकीचा असेलही, पण म्हणून लगेच रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरूप देणे योग्य नाही. आज सत्ताधारी पक्ष अशा गोष्टींना प्रोत्साहित करतो. शांतता आणि सुव्यवस्था ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे.
राज्यकर्ते आणि त्यांचे सहकारीच रस्त्यावर येऊ लागले व त्यामुळे दोन गटांमध्ये कटुता निर्माण होत असेल तर, ही काही चांगली गोष्ट नाही, असे खडे बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनावले.
येथे बुधवारी (ता. ७) पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, सकाळी टीव्हीवर पाहिले कोणीतरी औरंगजेबाचे छायाचित्र दाखविला. त्यावरून पुण्यात व अन्य ठिकाणी पडसाद उमटण्याचे कारण काय आहे? औरंगजेबाचे छायाचित्र दाखविले म्हणून काय परिणाम होतो, हे मला कळत नाही. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आदी पायाभूत सुविधांवर राज्यकर्त्यांचे लक्ष असले पाहिजे.
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात (बीआरएस) कोण जाते, याचा आढावा घेतला. काहींच्या जाण्यावरून फारशी चिंता करण्याची गरज नाही. ‘केसीआर’ महाराष्ट्रात येणार असतील तर, येऊ देत. सबंध देश त्यांना मोकळा आहे, असेही पवार म्हणाले. सध्या कांदा, कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांकडे पडून आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मागे राहील, असेही ते म्हणाले.
राज्यपालांना चिमटा
राज्यपाल रमेश बैस यांनी बाजीराव पेशवे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर पवार म्हणाले, ‘पेशव्यांच्यासंबंधी आस्था असलेला वर्ग आजही आहे. मागचे राज्यपाल फारच बोलके होते, हे आताचे कसे आहेत, ते अजून स्पष्ट झालेले नाही.’ असा चिमटा पवार यांनी काढला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी आघाडीचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात येऊ दे, फक्त विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगत पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार की शरद पवार यापैकी रिमोट कंट्रोल कोण असतील, या प्रश्नाला बगल दिली.
एकत्र निवडणुका अशक्य
लोकसभा व विधानसभेच्या दोन्ही निवडणुका एकत्र होतील, असे नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता ते शक्यच नाही. आपण आपले पाहू, राज्यांच्या निवडणुकांचे काय व्हायचे ते होऊदे, असे त्यांना (भाजप) वाटत असावे. दिल्लीची मान्यता असल्याशिवाय राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारही होत नाही. देशाचे राजकारण दोन लोक चालवत असल्याची टीका पवार यांनी केली.