esakal | ...म्हणून आमच्या घरी आयकर विभागाचा पाहुणचार झाला - शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

'...म्हणून आमच्या घरी आयकर विभागाचा पाहुणचार'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सोलापूर : सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. पण, ही छापेमारी का केली? याबाबत दिल्लीतील सत्ताधारी पक्षातील एकाने फोन करू सांगितल्याचं शरद पवार म्हणाले. 'उत्तर प्रदेशातील हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केलं ते काही रुजलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे आयकर विभागाचा पाहुणचार झाला, असं शरद पवार म्हणाले. आज ते सोलापुरात बोलत होते.

लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, मत मांडलं म्हणून घरावर छापेमारी केली जात आहे. ही छापेमारी चुकीची आहे. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे येथील जनता काहीही एक सहन करणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

राज्यात आघाडीचं सरकार चांगलं काम करत आहे. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांची तातडीने दखल घेतली. मात्र, महाराष्ट्र सरकारला दिल्लीवरून रोज त्रास दिला जातो. केंद्रातून अनेक गोष्टींचे पैसे राज्यात यायचे असतात. केंद्र सरकार अनेक गोष्टींवर कर वसूल करतात. तरीही केंद्राकडून महाराष्ट्राचा वाटा दिला जात नाही, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारला दिली.

केंद्रात मंत्री असतानाची सांगितली आठवण -

मनमोहन सिंह पंतप्रधान असताना मी केंद्रात मंत्री होतो. त्यावेळी गुजरातमध्ये भाजपचं सरकार होतं. आमचे काही मंत्री म्हणायचे की, भाजपच्या सरकारला मदत करू नका. पण, मी म्हटलं होतं, की गुजरातमधील जनतेशी आमचं भांडण नाही. गुजरातमधील जनतेला जी मदत लागली ती आम्ही त्यांना देऊ. त्यामुळे कुठलीही अडचण असेल तर गुजरातचे मंत्री माझ्याकडे यायचे. मात्र, आज त्याच मंत्र्यांचं सरकार केंद्रात असताना वेगळं राजकारण करतात. आता त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली. जनमत तयार करण्याची संधी तुमच्याजवळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही भाजपला खड्यासारखं बाजूला करा, असेही शरद पवार म्हणाले.

पोटनिवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगवेगळे लढले. तरीही ७० टक्क्याच्या आसपास जागा मिळाल्या. सर्वजण एकत्र लढलो असतो आपण भाजप १०० टक्के हरवू शकलो असतो. त्यामुळे येत्या निवडणुका कशा लढायच्या यावर विचार करावा लागेल, असेही पवार म्हणाले.

११ तारेखला महाराष्ट्र बंद -

उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक बैठक बोलाविली होती. उत्तर प्रदेशातील हिंसाचाराच्या विरोधात ११ सप्टेंबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ११ तारखेला एकही दुकान उघडता कामा नये आणि एकही वाहन रस्त्यावर दिसता कामा नये. कायदा हातात न घेता शांतपणे आपल्याला महाराष्ट्र बंद करायचा आहे. शेतकऱ्यांच्या वाट्याला कोणी गेलं, तर देशातील माणूस गप्प बसणार नाही हा संदेश केंद्र सरकारला द्यायचा आहे, असेही पवार म्हणाले.

loading image
go to top