अन्‌ 87 वर्षाच्या कार्यकर्त्यासाठी शरद पवार यांनी थांबवला ताफा 

अभय जोशी 
Sunday, 19 July 2020

श्री. पवार यांच्या गाडीचा ताफा काही वेळ पंढरपूर येथेही थांबला होता. यावेळी श्री. पवार यांनी आमदार भारत भालके यांना पुढे बोलवून त्यांना गाडीत बसूनच काही सूचना केल्या आणि सोलापूरला बैठकीला येण्यास सांगितले. 

पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूर तालुक्‍यातील बाजीराव विहीर या ठिकाणी 87 वर्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यासाठी आपल्या गाडीचा ताफा थांबवला. गाडीतूनच त्यांची विचारपूस करून ताफा पुढे गेला. पंढरपूर शहरात आमदार भारत भालके यांच्याशीही त्यांनी गाडीत बसूनच संवाद साधला. 
महाराष्ट्रात गावागावांमध्ये श्री. पवार यांचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. अनेक जुन्या कार्यकर्त्यांना श्री. पवार हे नावानिशी ओळखतात. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या सोबत श्री. पवार हे नेहमीच जिव्हाळ्याने संवाद साधत असतात. त्याचा प्रत्यय आज पंढरपूर तालुक्‍यातही आला. आज वेळापूरमार्गे पंढरपूरकडे श्री. पवार यांचा ताफा येत असताना बाजीराव विहिरीजवळ त्यांचे 87 वर्षाचे जुने व जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग गाजरे, माजी आमदार कै. औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू अमरजीत पाटील हे थांबले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या झेंड्यासह रस्त्याच्या कडेला उभा राहिलेल्या या लोकांना पाहून श्री. पवार यांनी गाडीचा ताफा थांबवून श्री. गाजरे यांची क्षणभर विचारपूस केली. अमरजीत पाटील यांनी श्री. पवार यांना "संघटन कौशल्य" हा ग्रंथ भेट दिला. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव अरुण आसबे व गुरु थिटे आदी सहकारी व ग्रामस्थ उपस्थितीत होते. 
पंढरपूर शहरात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाजवळ श्री विठ्ठल हॉस्पिटलच्याबाहेर आमदार भारत भालके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजुबापू पाटील, युवराज पाटील, सुधीर भोसले, लतीफ तांबोळी आदी पदाधिकारी थांबले होते. तिथेदेखील श्री. पवार यांच्या गाडीचा ताफा काही वेळ थांबला होता. श्री. पवार यांनी आमदार श्री. भालके यांना पुढे बोलवून त्यांना गाडीत बसूनच काही सूचना केल्या आणि सोलापूरला बैठकीला येण्यास सांगितले. नंतर सरगम चित्रपटगृहाजवळ माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, संदीप मांडवे आदी पदाधिकाऱ्यांनी श्री. पवार यांना निवेदन दिले. तेथून ताफा सोलापूरकडे रवाना झाला. 

संपादन : वैभव गाढवे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar stopped for an 87 year old activist