दूधदरासाठी 'या' शेतकरी संघटना आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचाही निर्धार

दूधदरासाठी 'या' शेतकरी संघटना आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचाही निर्धार

कऱ्हाड   महामारीच्या संकटातही देशाला जगवणाऱ्या बळीराजाची दौलत असणाऱ्या जनावरांच्या दुधाला सध्या दर मिळेना झालाय. त्यामुळे त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे आहे. पाण्याची बाटली 20 रुपयाला आणि दूधदर 18 रुपये लिटर अशी सद्यःस्थिती झाली आहे. दुधाला बाजारपेठेत मागणी कमी झाल्याने दुधाचे दर वाढत नाहीत, असा सूर आहे. मात्र, सध्या सर्वत्र व्यवहार सुरळीत होऊनही दूधदर ढासळले असल्याने हा व्यवसाय टिकण्यासाठी शासनाने यामध्ये तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. त्यासाठी आता शेतकरी संघटनांचे नेतेही अग्रेसर झाले आहे. त्यांनी देशाला जगवणाऱ्या बळीराजाला न्याय देण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अन्यथा त्यासाठी रस्त्यावरही उतरण्याचा निर्धार केला आहे.
तुम्ही सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड प्रवास करीत असाल तर हे वाचा
 
सध्या वाढलेले खाद्याचे दर शेतकऱ्यांच्या डोईजड झाले आहेत. त्याचबरोबर शेतकरी त्यासाठी दिवसभर शेतात श्रम करतात ते वेगळेच. त्यामुळे सध्या हा व्यवसाय परवडनासाच झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांसमोर दौलत सांभाळायची, की नाही असा प्रश्न उभा आहे. लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्याची मदत करून देशाला शेतकऱ्यांनी जगवले. त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांच्या दुधाला सध्या दर नाही. त्यामुळे त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडून न देता न्याय देण्याची गरज आहे, अन्यथा आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा निर्धार शेतकरी संघटनांनी केला आहे.
 
बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष साजीद मुल्ला म्हणाले, ""शेतकऱ्यांवर आजपर्यंत प्रत्येक सरकारकडून अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. सध्या गाईच्या दुधाचे दर 18 ते 19 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पाण्याची बाटली जर 20 रुपयाला मिळत असेल, तर शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून सांभाळलेल्या जनावरांच्या दुधाला 18 रुपये दर मिळावा, हे कोणत्या गणितात बसते. सरकारने किमान याचा विचार करून तरी शेतकऱ्यांच्या कष्टाला दाद द्यावी. दूध उत्पादनाची गणिते माहीत असूनही मंत्री लक्षात न आल्यासारखे का करत आहेत हाच मोठा प्रश्न आहे. सरकारने यासंदर्भातील तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा आम्ही शेतकऱ्यांसाठी आणि दूध हा शेतीपूरक व्यवसाय टिकण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे.''

 दुर्दैवी घटनाः साखर झोपेत होती चिमुकली...तो आला आणि २०० मिटर लांब घेवून गेला ! 

रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे म्हणाले, ""अमूल'सारखा दूध संघ जादा दूध दर देतो मग राज्यातील दूध संघांना तेवढा दर देणे का परवडत नाही? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. संबंधित संघांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांना यामागचे कारण जाहीरपणे सांगणे आवश्‍यक आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकरी जनावरांची जपणूक करतात. त्यासाठी दिवस-दिवसभर राबतात. एवढे करून जर दूधाला दरच मिळत नसेल, तर त्या राबण्याचा अर्थ तरी काय? सरकार याचा विचार करणार आहे की नाही. कोणतेही सरकार आले तरी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. मात्र, सध्याच्या सरकारने तातडीने दूध दरप्रश्नी मध्यस्थी करून शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेल एवढा तरी दूध दर देण्याची गरज आहे. तसे न झाल्यास आम्ही शेतकऱ्यांसह आंदोलन करून सरकारला जाब विचारू.'' 

संपादन - सिद्धार्थ लाटकर 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com