शिर्डी-पुणे-मुंबई शहरांसाठी हेलिकॉप्टर सेवेस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

घरातून जेवण करून जरी विमानतळावर पोचले, तरी फूड कोर्टची गरज भासतेच. त्यामुळे ते लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. देशातील अनेक विमानतळांवरील फूड कोर्ट उशिरापर्यंत सुरू असतात. त्या धर्तीवर पुणे विमानतळावरही सुधारणा व्हायला हव्यात.
- प्रिया शर्मा, नियमित प्रवासी

पुणे - शिर्डीतील देवदर्शनासाठी सकाळी दहा वाजता जाऊन सायंकाळी चार वाजेपर्यंत परतायचे आहे...? एरवी अशक्‍य वाटणारा हा प्रवास आता शक्‍य झाला आहे. कारण शहरातून सुरू झाली आहे ‘ब्लेड इंडिया’ची हेलिकॉप्टर सेवा. मुंबईसाठीही हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंढव्यातील केशवनगरमध्ये ‘ब्लेड’ने हेलिपॅड उभारले आहे. तेथून पुणे-शिर्डी आणि पुणे-मुंबई मार्गावर हेलिकॉप्टर सेवा नुकतीच सुरू करण्यात आली. मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना जुहू आणि महालक्ष्मी येथेही जाणे शक्‍य आहे. अत्याधुनिक सेवा देणारे आणि पाच आसनक्षमतेचे हेलिकॉप्टर प्रवाशांसाठी उपलब्ध झाले आहे. पुण्यातून शिर्डीसाठी ४५ मिनिटे; तसेच मुंबईसाठीही ४५ मिनिटांत हेलिकॉप्टरने प्रवाशांना पोचता येणार आहे.

कंपनीने मुंबई-शिर्डी मार्गावरही हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे. तिन्ही मार्गांचे भाडे, वेळापत्रक आदींची माहिती प्रवाशांना ‘ब्लेड इंडिया’च्या वेबसाइटवर मिळेल. त्यावरच प्रवासासाठी आरक्षण करता येणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. पुणे, मुंबई, शिर्डीनंतर राज्यातील अन्य शहरांमध्ये; तसेच देशातील विविध राज्यांत हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येणार आहे, असेही ‘ब्लेड’कडून स्पष्ट करण्यात आले.

विमानतळावरील फूड कोर्ट लवकरच होणार सुरू
विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूषखबर! लोहगाव विमानतळाच्या आवारात बंद पडलेले फूड कोर्ट सुरू होण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून, सुमारे दीड महिन्यात ते सुरू होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. 

विमानतळाच्या आवारात नोव्हेंबर २०१८ मध्ये फूड कोर्ट सुरू झाले होते. राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तेथे उभारले होते. तसेच, रेस्टॉरंटही सुरू झाले होते. परंतु, काही समस्या उद्‌भवल्यामुळे मागील वर्षी सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बंद पडले होते. याबाबत विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग म्हणाले, ‘‘फूड कोर्टसाठी निविदा प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सुरू केली आहे. फूड कोर्ट सुरू होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. परंतु, प्रवाशांची गरज लक्षात घेऊन ३० ते ४५ दिवसांत फूड कोर्ट सुरू होतील, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.’’ पुण्यातून थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच, सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रवाशांना प्रवासाच्या नियोजित वेळेच्या सुमारे दोन तास आधी विमानतळावर पोचावे लागते. तसेच, विमानतळावर पोचण्यासाठीही त्यांना तत्पूर्वी प्रवास करावा लागतो. त्यामुळे विमानतळावर पोचल्यावर त्यांना फूड कोर्टची गरज भासते. हे लक्षात घेऊन ते लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असेल, असेही कुलदीपसिंग यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shirdi pune mumbai helicopter service