राष्ट्रीय स्तरावर आघाडीसाठी शिवसेनेचा पुढाकार 

uddhav-thackeray
uddhav-thackeray

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चौफेर उधळलेला भाजपचा वारू रोखण्याचा विडा मुंबईत उचलला असतानाच राष्ट्रीय स्तरावर भाजप आणि कॉंग्रेसविरहित आघाडी उभारण्याची जुळवाजुळव सुरू केल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील "मिनी विधानसभे'च्या रणसंग्रामाच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'शी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील सरकारचा पाठिंबा काढण्यावर योग्य वेळी विचार करू, असे नमूद केले. भारतीय जनता पक्ष गेल्या काही वर्षांत संपूर्णपणे बदलला असून, गुंडांना मंचावर आणणाऱ्यांशी सहकार्य कसे करणार, असा प्रश्‍न त्यांनी केला. दाऊदला मुसक्‍या बांधून आणण्याची वल्गना करणारा भाजप उद्या त्याला दाऊदाचार्य म्हणून जाहीर सभेत मानाचे स्थानही देईल, अशी जहरी टीकाही त्यांनी आज केली. 


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दरवेळी शिवसेनेसमोर नवे आव्हान उभे राहाते, यावेळचे भाजपने उभे केलेले आव्हान तर फार सोपे आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्याशी झालेली प्रश्‍नोत्तरे - 

प्रश्‍न : शिवसेनेला गेल्या 15 वर्षांतील "ऍन्टी इन्कम्बन्सी'चा सामना करावा लागतो आहे का? 
उद्धव ठाकरे : आम्ही केलेली कामे मोठी आहेत. "ऍन्टी इन्कम्बन्सी' कोठेही नाही. गेल्या पाच वर्षांतील कामांच्या आधारावर निवडणुका जिंकणार आहोत. पारदर्शी कारभारात मुंबई महापालिकेला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे. आता या कारभारापासून भाजपला परिवर्तन हवे असेल तर म्हणजे काय, हे स्पष्ट आहे. 

प्रश्‍न : शिवसेनेच्या कारभारावर प्रचंड आरोप झाले. विशेषतः कंत्राटदारांशी हातमिळवणी... 
उद्धव ठाकरे : (मध्येच तोडत) आमच्या कारभाराला पारदर्शीपणाचे प्रशस्तिपत्रक मिळाले आहे, त्यामुळे या आरोपांवर काय बोलणार? शिवाय, ज्या कंत्राटदारांवर आरोप केले, त्यांना मग मेट्रोचे कंत्राट का दिले, नागपुरात कामे का सोपवली गेली? 

प्रश्‍न : भाजप प्रथमच वेगळा लढतो आहे, मराठी सेनेकडे आणि अन्य भाषक भाजपकडे असा सामना बहुभाषक मुंबईत शिवसेनेसाठी अडचणीचा ठरू शकेल? 
उद्धव ठाकरे : तसे मानणे चूक आहे. प्रथमच 227 जागांवर लढण्याची संधी शिवसैनिकांना मिळते आहे. मुंबईकरांना त्याचा आनंद आहे. पूर्वी आम्ही अमराठींना भाजप लढत असलेल्या वॉर्डांत संधी द्यायचो, आता आम्ही अमराठी उमेदवार दिले आहेत. दोन- तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा होती, आता तसे राहिलेले नाही. भ्रष्टाचार दूर करण्याच्या नावाने नोटाबंदीची घोषणा दिली गेली, त्यात नागरिक पिचले गेले आहेत. 

प्रश्‍न : या मोहिमेमागचा हेतू चांगला होता, असे मानले जाते. 
उद्धव ठाकरे : कोण म्हणतेय तसे? या निर्णयामुळे जनतेला त्रासाला सामोरे जावे लागले. स्विस बॅंकेतला पैसा येणार होता, त्याचे काय झाले? या राजवटीला कंटाळलेली जनता हे प्रश्‍न विचारते आहे. लोकसभा निवडणुकीत लाट होती, त्यात भाजपला यश मिळाले. विधानसभेच्या वेळी आम्हाला अंधारात ठेवून युती तोडली गेली. या वेळी आम्ही गाफील नव्हतो. सामान्य माणसासाठीच आम्ही स्वबळावर लढतो आहोत. 

प्रश्‍न : विधानसभेत एकत्रपणे लढले असता, तर तुम्ही मुख्यमंत्री झाले असता, असे भाजपचे नेते म्हणतात... 
उद्धव ठाकरे : आम्हाला ज्या जागा देत होते, त्यात अर्थ नव्हता. वाजपेयी, अडवानींच्या वेळी भाजप वेगळा होता. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे स्मरण व्हायचे, त्यामुळे आम्ही विधानसभेच्या वेळी योग्य निर्णय वेळीच घेऊ शकलो नाही. पण, त्यांनी युती तोडल्याने आम्हाला शक्‍ती दाखवता आली. मोदींचा वारू पहिल्यांदा रोखला गेला महाराष्ट्रात. त्यानंतर दिल्लीत काय घडले; बंगाल, बिहारमध्ये काय झाले ते माहीत आहेच. 

प्रश्‍न : पण भाजपची महाराष्ट्रातील आमदारसंख्या जास्त आहे, ते आता मोठे भाऊ झाले. बदललेले हे नाते शिवसेना स्वीकारण्यास तयार नाही, असे भाजप नेते म्हणतात... 
उद्धव ठाकरे : (हसत) कोणत्याही पक्षाची जन्मतारीख कशी बदलणार? 

प्रश्‍न : भाजपला मुंबईत केवळ 60 जागा देऊ केल्यात तुम्ही? 
उद्धव ठाकरे : योग्यच होती ती संख्या. त्यांनी आम्हाला 114 जागा घ्या म्हणणे योग्य असेल, तर आम्ही त्यांना 60 जागा देऊ करणे गैर कसे? पूर्वी भाजपसमवेत असलेले सहकारी पक्ष त्यांच्या समवेत नाहीत. त्यांना आता हिंदुत्ववादी शिवसेनेपेक्षा मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी, नवाझ शरीफ जवळचे वाटतात. मी त्याला काय करणार? 

प्रश्‍न : पण देवेंद्र फडणवीस आणि तुमचे संबंध उत्तम होते म्हणतात. 
उद्धव ठाकरे : हो तर. मात्र त्यांच्या पक्षातून वेगवेगळी वक्‍तव्ये होत असतात. एकतर ही भाजपमधील नेत्यांची मिलीभगत असावी किंवा त्यांचे त्यांच्या सहकाऱ्यांवर नियंत्रण नसावे. राज्य सरकारचा कारभारही योग्य चाललेला नाही. एक सांगतो, नगरपालिकांत आम्ही युती करायचे ठरवले, काही ठिकाणी नाही होऊ शकली युती. आपण दोघांनीही प्रचाराला जायचे नाही असे आमच्यात ठरले होते. जेथे झाली नाही युती तेथे काय सांगायचे, असा प्रश्‍न होता. मी नाही गेलो, पण फडणवीस गेले. ते का गेले, निर्णय का पाळला नाही, हे त्यांनाच विचारा. 

प्रश्‍न : फडणवीस सरकारचा पाठिंबा आपण काढणार काय? 
उद्धव ठाकरे : काढला जाऊही शकतो पाठिंबा... 

प्रश्‍न : तुमचे मंत्री आणि आमदारांना हा निर्णय रुचेल काय? ते देतील राजीनामे? 
उद्धव ठाकरे : शिवसेना हा आमदारांचा नाही, सैनिकांचा पक्ष आहे. त्यातील मंडळीच आमदार आहेत ना? 

प्रश्‍न : तसे झाले तर महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होईल. 
उद्धव ठाकरे : पद्‌मविभूषण आहेत ना.. ते काय करतील ते माहीत नाही. 

प्रश्‍न : महापालिकांबरोबरच महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्याही निवडणुका होत आहेत. 
उद्धव ठाकरे : हो आहेत ना; पण आमचे तेथील नेते सक्षम आहेत. स्थानिक नेत्यांवर आम्ही त्याची जबाबदारी टाकली आहे. 

प्रश्‍न : भाजपशी असलेले आपले संबंध पार ताणले गेले आहेत... 
उद्धव ठाकरे : भाजपमधील पिढी बदलली, आमच्याहीकडे पिढी बदलली. ते पार बदलले आहेत. देशाचा विचार केला, तर आता प्रादेशिक महासंघाची गरज आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश मुख्यमंत्री आहेत, ते कदाचित वडिलांपेक्षा वेगळा विचार करणारे असतील. मला वाटते प्रत्येक प्रदेशाच्या विकासावर भर देणाऱ्या किमान समान कार्यक्रमाची गरज आहे. शिवसेना त्यासाठी पुढाकार घेईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com