
Shiv Sena: स्वतःच्या घरी पाळणा हलत नाही, मग ज्यांच्या घरी...CM शिंदेंवर शिवसेनेची टीका
स्वतःच्या घरी पाळणा हलत नाही, मग ज्यांच्या घरी हलतोय त्यांच्या नावाने बोटे मोडायची किंवा जादूटोणा करायचा अशा वृत्तीची अवलाद महाराष्ट्राच्या नशिबी यावी हे दुर्भाग्य नाही तर काय? अशा शब्दात मुखपत्र सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. (shiv sena criticized on chief minister Eknath Shinde bjp Vedanta Foxconn )
वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलं आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातला जाण्यास माविआ सरकार जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यानंतर मुखपत्र सामनातून सेनेने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत स्वतःच्या घरी पाळणा हलत नाही, मग ज्यांच्या घरी हलतोय त्यांच्या नावाने बोटे मोडायची किंवा जादूटोणा करायचा असा आरोप करण्यात आला आहे. तसेच, शिंदेंचे नाव बदलून श्रीमान 'खापरफोडे' ठेवा अशी मागणी केली आहे.
काय म्हटले आहे सामना अग्रलेखात?
सुरत व गुवाहाटी येथे बेइमान आमदार गटास शिंदे सांगत होते, ‘‘घाबरू नका. आपल्यापाठी एक महाशक्ती आहे. आता आपल्याला हवे ते मिळेल!’’ शाब्बास शिंदे! तुम्हाला हवे ते मिळाले; पण महाराष्ट्रातील आणि रोजगार मात्र तुमच्या त्या बकासुरी महाशक्तीने ओरबाडून नेला. त्याचे खापर आधीच्या सरकारवर फोडून तुम्ही तुमच्या अकलेची दिवाळखोरी जाहीर केली आहे. उद्या हे महाराष्ट्रातील जनावरांत पसरत असलेल्या ‘लम्पी’ आजाराचे खापरही आघाडी सरकारवर फोडतील.
स्वतःच्या घरी पाळणा हलत नाही, मग ज्यांच्या घरी हलतोय त्यांच्या नावाने बोटे मोडायची किंवा जादूटोणा करायचा अशा वृत्तीची अवलाद महाराष्ट्राच्या नशिबी यावी हे दुर्भाग्य नाही तर काय? आज एक लाख नोकऱया देणारा वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प या लोकांनी दुसऱया राज्यात जाऊ दिला. पाठोपाठ महाविकास आघाडी सरकारने कसोशीने पाठपुरावा केलेला ‘बल्क ड्रग पार्क’ हा आणखी एक मोठा प्रकल्पही महाराष्ट्राने गमावला आहे.
महाराष्ट्रात येऊ घातलेला हा प्रकल्प आता गुजरातसह आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये उभारला जाणार आहे. आणखी असे किती उद्योग महाराष्ट्रातून इतर राज्यांत जातील हे सध्याचे ‘ईडी’ सरकार आणि त्यांच्या त्या ‘महाशक्ती’लाच माहीत. त्यांच्या मनात आणखी काय काय सुरू आहे ते एखाद्या अघोरी बाबा-बुवालाच माहीत. कारण हिंदूंचे देव आणि संत या सरकारला कदापि आशीर्वाद देणार नाहीत.
वेदांता – ‘फॉक्सकॉन’ची लूट शिवसेनेने उघड केली नसती तर हा घास पचवून त्यांनी आणखी काही गिळले असते. त्यांना ‘फॉक्सकॉन’प्रमाणे मुंबई-ठाणे जिंकायचे आहे. त्यांना महाराष्ट्रातला शेती उद्योग खतम करायचा आहे. त्यांना महाराष्ट्राचे वैभव, लौकिक नष्ट करून महाराष्ट्राला दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे करायचे आहे. शिंदे गटाच्या पाठीमागे असलेल्या महाशक्तीने महाराष्ट्राशी उभा दावा मांडला आहे. शिंदे मात्र सर्व खापर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर फोडून स्वतःचे अपयश झाकत आहेत. शिंदे यांचे नाव बदलून यापुढे श्रीमान खापरफोडे असेच ठेवायला हवे.