
मुंबई : शिवसेना, शिवाजीपार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे गेल्या ५० वर्षांतील समीकरण शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर अडचणीत आले आहे. सध्या शिंदे गटात गेलेले दादर येथील स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी मुंबई महापालिकेकडे यंदाच्या मेळाव्यासाठी मैदान मिळण्यासाठी अर्ज केल्याने उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर संकट ठाकले आहे. त्यातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही पक्षप्रमुख राज ठाकरे यांना या ठिकाणी मेळावा घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे यंदा दसरा मेळाव्याबाबत तिन्ही पक्षांमध्ये चुरस लागली आहे, तर दसरा मेळावा नेमका कुणाचा होणार याची उत्सुकता जनतेला लागली आहे.
शिवसेनेकडून दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने दादरचे आमदार सदा सरवणकर दरवर्षी मैदान मिळण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करतात. यंदा ते शिंदे गटात सामील झाल्यामुळे त्यांना पक्षाच्या विभागप्रमुख पदावरून काढून टाकण्यात आले आहे. शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी २२ ऑगस्टला शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई यांनी पालिकेकडे परवानगीचा अर्ज केला आहे. या अर्जावरील सुनावणी प्रलंबित असताना आता शिंदे गटाने ३० ऑगस्ट रोजी परवानगीसाठी अर्ज केला आहे. आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती देताना, ‘मी शिवसेनेचा आमदार आहे. गेली १५ वर्ष मी दसरा मेळाव्यासाठी अर्ज करतो. त्यानुसार यावर्षीही अर्ज केला असून या दसरा मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन एकनाथ शिंदे करणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार या दसरा मेळाव्यातुन दिले जातील. मी प्रत्येक वर्षी अर्ज करतो, त्यामुळे मला परवानगी मिळावी, अशी आमची भावना आहे,’ असे सांगितले.
मनसेची वादात उडी
शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये दसरा मेळाव्यावरून चढाओढ रंगली असतानाच मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या वादात उडी घेतली आहे. ‘हिंदूंची मरगळलेली मने पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांच्यात आहे,’ असे म्हणत देशपांडे यांनी राज ठाकरे यांना शिवाजी पार्कवरच सभा घेण्याचे केले आहे.
शिंदे गटाला कसा इतिहास?
याबाबत बोलताना शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ‘आतापर्यंत विभागप्रमुख म्हणून शिवसेना पक्षाकडून सरवणकर हेच दसरा मेळाव्यासाठी अर्ज करत होते. परंतु त्यांना या पदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांना अर्ज करण्याचा अधिकार नाही. शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळाव्याला एक मोठा इतिहास आहे. शिंदे गटाला काय इतिहास आहे? सरवणकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, तेव्हा अर्ज का केला नव्हता?,’ असा सवाल कायंदे यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.