Video : उद्धव ठाकरे मध्यरात्री पवारांच्या भेटीला; कोण कोण पोहोचले?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

पवार यांच्या "सिल्वर ओक' या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. शुक्रवारी मुंबईत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. ​

मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका आटोपल्यानंतर आता मुंबईत बैठका सुरू झाल्या आहेत. गुरुवारी मध्यरात्री शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आदित्य आणि खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान गाठले.

पवार यांच्या "सिल्वर ओक' या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. शुक्रवारी मुंबईत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. या संयुक्त बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या चर्चेला महत्व प्राप्त झाले आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित असल्याची माहिती आहे. उद्याच कॉंग्रेस आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली असून पुढील 48 तासांत सरकार स्थापनेचा दावा केल्या जाण्याची शक्‍यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

शरद पवार हे दिल्लीहून मुंबईतील त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचताच शिवसेना नेते शरद पवार यांना भेटायला गेले होते. काल (ता. 21) राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये नवी दिल्लीत बैठक झाली असून, या बैठकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात सर्व मुद्द्यांवर मतैक्य झाले असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते.

समाजवादी नेते महम्मद खडस यांचे निधन

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात संवाद सुरु असून सत्तास्थापनेच्या मुद्द्यांवर चर्चा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे हे शरद पवार यांची आज भेट घेणार होते परंतु, आजऐवजी काल मध्यरात्रीच उद्धव ठाकरे यांनी का भेट घेतली असेल यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचे केंद्र हे पुन्हा एकदा सिल्वर ओक झालेले पाहायाला मिळत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena leader uddhav thackeray meets ncp leader sharad pawar at silver oak