जिल्हा बँक काय जिंकली, महाराष्ट्र हलवायची भाषा करतायत; सामनातून राणेंवर 'प्रहार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"जिल्हा बँक काय जिंकली, महाराष्ट्र हलवायची भाषा करतायत"

"जिल्हा बँक काय जिंकली, महाराष्ट्र हलवायची भाषा करतायत"

सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) जिल्हा बँकेच्या निवडणुका पार पडल्या. संपुर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या या निवडणुकांमध्ये नारायण राणे (Narayan Rane), नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलने जोरदार विजय मिळवला. एकीकडे राणे आणि दुसरीकडे शिवसेना अशे कट्टर विरोधक आमने-सामने उभे ठाकल्याने ही निवडणुक चर्चेची आणि प्रतिष्ठेची ठरली. विजयानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत ही निवडणुक म्हणजे राज्यातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात असल्याचे संकेत दिले. त्यांच्या संपुर्ण वक्तव्याचा आज शिवसेनेचं मुखपत्र सामनातून (Saamana) समाचार घेण्यात आला आहे.

हेही वाचा: सतराव्या लोकसभेतही खासदार सुप्रिया सुळे ठरल्या देशात अव्वल

'सिंधुदुर्ग झालं आता पुढचं लक्ष्य राज्य' असं म्हणत नारायण राणे यांनी आता राज्यात भाजपचं सरकार आणण्यासाठी काम करत असल्याची भूमिका मांडली. राज्याला मुख्यमंत्री नाही असं म्हणत त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता सामनातून या सर्व गोष्टींवर भाष्य करण्यात आलंय. तसंच या निवडणुकीत झालेल्या हिंसक घटनांवरून देखील संजय राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा: राज्यात ऑक्सिजनची तिप्पट उपलब्धता - अजित पवार

सामनामध्ये काय म्टलंय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक ही खून, अपहरण, दहशतवाद यामुळे गाजते. काल संपलेली जिल्हा बँकेची निवडणूकही त्यास अपवाद ठरली नाही. शिवसेनेचे या भागातील प्रमुख कार्यकर्ते व निवडणुकीचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर निर्घृण खुनी हल्ला झाला. नशीब बलवत्तर म्हणून परब वाचले. या खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आमदार पुत्र नितेश राणे संशयित आरोपी असून ते फरारी आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. याचा अर्थ असा की, पोलिसांकडे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे आहेत. न्यायालयाने ते मान्य केले. आता याचदरम्यान जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली व त्याचे निकालही लागले. निकाल नारायण राणेकृत भाजपच्या बाजूने लागला. 19 पैकी 11 जागांवर भाजपच्या सिद्धिविनायक पॅनलने निर्विवाद बहुमत मिळविले.

शिवसेनेसह महाविकास आघाडीस 8 जागा मिळवता आल्या. म्हणजे निवडणुकीत घासून टक्कर झाली व निसटता पराभव किंवा निसटता विजय झाला. तरीही भाजपचे ‘पॅनल’ जिंकले. 11 विरुद्ध 8 हा निकाल. यास दणदणीत विजयही म्हणता येणार नाही व दारुण पराभवही म्हणता येणार नाही. राज्यातील 31 जिल्हा बँकांपैकी ज्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे, त्या-त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने निवडणुका होत आहेत. मात्र, एक सिंधुदुर्ग सोडले तर निवडणुका पार पडलेल्यांपैकी कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत साताऱ्यातील दोन राजे मंडळांत शाब्दिक चकमकी झडल्या व निवडणुकीचे वातावरण तापले, पण सिंधुदुर्गप्रमाणे तेथे तलवारी, बंदुका निघाल्या नाहीत. विरोधकांना धमकावणे, अपहरण करणे, खुनी हल्ले करणे, विरोधकांच्या बाबतीत अश्लील, असंसदीय भाषेचा वापर करण्याचे प्रकार सिंधुदुर्ग वगळता अन्यत्र कुठे झाले नाहीत. साताऱ्यात उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्यात जिल्हा बँकेच्या निमित्ताने शाब्दिक जुगलबंदी झाली, पण ती रंगतदार ठरली. सिंधुदुर्गात रंगतदार काहीच नसते. जे घडते ते रक्तरंजित असते, हा इतिहास एकाच व्यक्तीभोवती फिरत असतो. श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर हे राजकीय नरबळीच आहेत. हे नरबळी कसे गेले यासाठी केंद्रीय गृहखात्याने एखादी ‘एसआयटी’ नेमायला हवी. भारतीय जनता पक्षानेही सिंधुदुर्गात याच दहशती हल्ल्यांचा पुरेपूर स्वाद घेतला आहे, पण आता हेच लोक खाटीकखान्यात बसून प्रवचने झोडत आहेत. सिंधुदुर्गात भाजपने 19 पैकी 11 जागा बँकेच्या निवडणुकीत जिंकल्या आहेत.

महाविकास आघाडीने तीन जागा काठोकाठ गमावल्या. म्हणजे पहा, कणकवली तालुका शेती उत्पादक संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. त्यांच्याविरोधात भाजपचे विठ्ठल देसाई उभे होते. या मतदारसंघात दोन्ही उमेदवारांना समान 17-17 अशी मते मिळाली. शेवटी चिठ्ठी टाकून निकाल घेण्यात आला व चिठ्ठी सतीश सावंत यांच्याविरोधात गेली. त्यात भाजपचे देसाई विजयी झाले. इतर ठिकाणीही महाविकास आघाडीचे उमेदवार थोडक्यात पडले. जिल्हा बँक राण्यांनी जिंकली हे सत्यच आहे. आता जिल्हा बँकेचा आणि महाराष्ट्राच्या सत्तेचा काही संबंध आहे काय? पण जिल्हा बँकेत 11 जागा जिंकून येताच ‘‘आता लक्ष्य महाराष्ट्र’’ अशी आरोळी केंद्रीय मंत्री राणे यांनी ठोकली. जिल्हा बँकेचे पॅनल जिंकल्याने महाराष्ट्रासारख्या राज्यात सत्ताबदल होतो, हे वेगळेच अकलेचे गणित यानिमित्ताने समजले. जिल्हा बँक जिंकली म्हणजे जणू जागतिक बँकेवरच विजय मिळवला, असे भाजप पुढाऱ्यांना वाटत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली. तशा महाराष्ट्रातील 31 पैकी बहुसंख्य जिल्हा सहकारी बँकांवर महाविकास आघाडीचाच ताबा आहे. अशा शब्दांत सामनातून या नारायण राणे आणि भाजपचा समाचार घेण्यात आला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sanjay Raut
loading image
go to top