
घराचं मोजमाप करताना पाहिलं अन् ठाकरेंच्या आमदाराला रडू कोसळलं, म्हणाले चित्रपटात जसं...
राज्यात शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील आमदार, खासदार आणि मंत्री शिंदे गटात जाऊ लागले. जे काही निष्ठावंत समजले जातात त्यांना नोटिस आणि दबाव टाकला जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
अशातच शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यानंतर आता राजापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घराची ACB कडून मोजमाप करण्याचे काम चालू आहे.
या विषयावर आमदार राजन साळवी यांनी माहिती दिली आहे. गेल्या चार महिन्यापासून ACB कडून चौकशी चालू आहे. दरम्यान आज त्यांच्या रत्नागिरी शहरातील राहत्या घराचं मूल्यांकन करण्यात आलं. एसीबीने दिलेल्या नोटिसीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे मूल्यांकन केलं.
साळवी झी २४ तासला बोलत होते, बोलतांना आमदार राजन साळवी यांना अश्रू अनावर झाले. राहत्या घराचं मूल्यांकन केलं हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, आज अधिवेश संपल्यानंतर घरी आलो त्यांनंतर बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांनी घराचं मोजमाप केलं, या घरावरती 25 लाखांचं कर्ज आहे.
आज बांधकाम विभागाचे अधिकारी आले त्यांनी घराचे बाहेरून मोजमाप केले, घरातील हॉल, किचनमध्ये, बेडरुममध्ये येऊन मोजमाप करताना पाहिलं. हे पाहताना खुप वाईट वाटलं.
जसं चित्रपटात पाहतो की, एखादं घर लिलावत जाण्याआधी त्याची आधी जप्ती करण्याआधी त्याचं मोजमाप केलं जातं. त्याच पद्धतीने मोजमाप करताना पाहिलं” ज्या पद्धतीने मला मानसिक त्रास दिला जातोय त्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय दु:खी आहेत” असं राजन साळवी म्हणाले.
“माझा विश्वास आहे, आतापर्यंत जे मी कष्टानं कमवलं ते मी माझ्या व्यवसायातून उभं केलेलं आहे. मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. माझ्या मागे लागलेला हा चौकशीचा ससेमिरा आगामी काळात दूर होईल, अशी आशा बाळगतो. शासनाच्या वतीने कर्मचारी आले त्यांनी घराचं मोजमाप घेतलं तो त्यांचा अधिकार आहे” अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.