
एआय़च्या मदतीने फोटो, व्हिडीओ तयार करण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. आता इतिहासात एखादं शहर, गाव कसं दिसत असेल त्याबाबत प्रॉम्प्ट देऊन एआय़कडून फोटो तयार करून घेतले जात आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एआयच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा क्षण कसा असेल याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
रायगडावर ३५० वर्षांपूर्वी झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याचा एआयच्या मदतीने हा व्हिडीओ तयार करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला मराठा साम्राज्यासह देशविदेशातील काही मंडळीही उपस्थित होते. यात इंग्रज अधिकारी असलेला हेन्री ऑक्सेंडन हासुद्धा होता. त्यानं रायगडावर झालेल्या सोहळ्याचं वर्णन त्याच्या डायरीत सविस्तर लिहून ठेवलंय. याच्याच आधारे एआयच्या मदतीनं हा राज्याभिषेक सोहळ्याचा व्हिडीओ तयार करण्यात आलाय.