
ठाकरे कांदेंचा नाशिकमध्ये 'सामना'; शिवसैनिक आक्रमक
नाशिक : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची बंडखोरांना उत्तर देण्यासाठी शिवसंवाद यात्रा सुरू आहे. महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा, मेळावा घेण्याचा तडाखा त्यांचा चालू आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील मनमाड येथे ते आज सभा घेणार असून बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी त्यांना आव्हान देत त्यांच्या सभेवेळी भेटून काही सवाल विचारणार असल्याचं सांगितलं आहे. त्याबरोबर यासंदर्भात निवेदन देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून कांदे यांचा ताफा नाशिकमध्ये अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.
(Aditya Thackeray VS Suhas Kande)
बंडखोर आमदार सुहास कांदे आदित्य ठाकरे यांच्या भेटीला निघालेले असून शिवसैनिकांकडून नाशिकमधील पिंपळगाल टोलनाक्यावर त्यांचा ताफा अडवण्यात आला होता. पण त्यातून सुहास कांदे मनमाडकडे रवाना झाले आहेत. यावेळी ते हिंदुत्वासाठी लढलो यात माझी काय चूक झाली? असा सवाल करणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरूनही आदित्य ठाकरेंना काही सवाल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
"हिंदुत्वासाठी लढलो ही चूक झाली का? असा सवाल सुहास कांदे विचारणार आहेत. इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरेंनी मी केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तर आमदारकीचा राजीनामादेखील देण्यात तयार आहे." असं म्हणत कांदे यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान केलं आहे. एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी आलेली असताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना सुरक्षा दिली नाही. याचं उत्तर शिवसेनेने आणि आदित्य ठाकरे यांनी आज मला द्यावं मी लगेच राजीनामा देतो आणि परत निवडणूक लढवून दाखवतो असा टोला कांदेंनी लावला होता. यासंदर्भातील निवेदन आज आदित्य ठाकरे यांना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.