अहमद पटेल, उद्धव ठाकरेंची चर्चा; महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाटून घेतले जाईल तर पूर्ण पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद हे काँग्रेसकडे राहील या निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाल्याचे वृत्त आहे.

मुंबई : भाजपला अडचणीत आणण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंगेस एकत्रित येताना दिसत आहेत. आज याबाबत राष्ट्रवादीची बैठक झाली. तसेच शिवसेना प्रमुख, उद्धव ठाकरे व काॅंग्रेसचे नेते अहमद पटेल यांची चर्चा झाली असून, यामध्ये फाॅर्म्युला ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे.

सध्या राजकीय घडामाेडींना वेग आला असून, राेज बैठकांचे सत्र सुरु असताना दिसत आहे. लवकरच सरकार स्थापन हाेणार असल्याची माहिती काॅंग्रेसच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेचे अंतिम सूत्र ठरल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाटून घेतले जाईल तर पूर्ण पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद हे काँग्रेसकडे राहील या निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाल्याचे वृत्त आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे खासदार आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल यांच्यामध्ये मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

राज्यामधील सर्व महामंडळे आणि समित्यांचे समसमान वाटप केली जाईल असंही या बैठकीत ठरल्याचे समजते. तसेच कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्री निवडायचे हा निर्णय प्रत्येक पक्ष घेऊ शकतो असंही ठरलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाकरे कुटुंबातील व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवण्यास विरोध होत असल्याचे वृत्त होते. मात्र दोन्ही काँग्रेसने शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीबद्दल आमचा कोणताही आक्षेप नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे शिवसेना कोणत्याही व्यक्तीला अडीच वर्षांसाठी या पदावर बसवू शकते.

भाजपाबरोबर युती करुन विधानसभा निवडणुक लढलेल्या शिवसेनेने युतीला बहुमत मिळाल्यानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यात यावे अशी अट घातली होती. मात्र भाजपने ती अट मान्य केली नाही. त्यामुळेच आत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडे जवळपास सारख्याच जागा असल्याने पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप करण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी घेतल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena and ncp will share the cm post congress will get deputy cm