मनमोहनसिंग या शहाण्या माणसाचा सल्ला गांभीर्याने घ्या नाहीतर...: शिवसेना

वृत्तसंस्था
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

मनमोहन सिंग यांच्या पाठोपाठ नितीन गडकरी यांचे तितकेच टोकदार वक्तव्य आले आहे. सरकार जेथे जेथे हात लावते तेथे तेथे सत्यानाश होत असल्याचा भाला गडकरी यांनी खुपसला आहे. नोटाबंदी व जीएसटी ही या सत्यानाशाची उदाहरणे आहेत.

मुंबई : कलम 370 हटवून सरकारने धाडसी पाऊल टाकले व देश त्याबद्दल आनंदी आहे. मात्र काश्मीर आणि आर्थिक मंदी हे दोन भिन्न विषय आहेत. आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवलाय व मौनीबाबा डॉ. मनमोहनसिंग यांनी सौम्य शब्दांत सांगितलेल्या सत्याचाही स्फोट झालाच आहे. अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार वगैरेपुरताच उरला आहे. त्यातून देशाची व्यवस्था नष्ट होत आहे. आर्थिक मंदीचे राजकारण करू नये व तज्ज्ञांच्या मदतीने देश सावरावा असे आवाहन मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केले आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच राष्ट्राचे हित आहे, असा इशारा शिवसेनेने सरकारला दिला आहे.

आर्थिक मंदीवर मनमोहनसिंग यांनी नुकतेच वक्तव्य करत नोटाबंदी आणि जीएसटी हे सरकारचे निर्णय चुकलेच असे म्हटले होते. यावर आज (बुधवार) शिवसेनेने अग्रलेख लिहून सरकारला मनमोहनसिंग यांची वक्तव्ये गांभीर्याने घेण्याचा सल्ला दिला आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की श्रीगणेश हे विघ्नहर्ता दैवत आहे. गणेशाच्या आगमनाने विघ्ने दूर होतील अशी आशा होती, पण देशाच्या अर्थव्यवस्थेचे विघ्न काही दूर होताना दिसत नाही. उलट चिंतेत भर टाकणाऱ्या बातम्या येत आहेत. त्यात मनमोहन सिंग यांनी मंदीसंदर्भात भाष्य केले व भविष्यातील कठीण काळाची जाणीव करून दिली. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. अर्थव्यवस्था घसरली आहे व भविष्यात कोसळणार आहे असे जेव्हा मनमोहन सिंग सांगतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. अर्थव्यवस्थेतील खाचखळग्यांबाबत मनमोहन सिंग बोलत आहेत. देशात आर्थिक मंदीमुळे जी भयंकर स्थिती उद्भवली आहे, त्याचे भाकीत मनमोहन सिंग यांनी चार वर्षांपूर्वीच केले होते. आज जे घडत आहे ते घडणार असे ‘मि. क्लीन’ मनमोहन यांचे तळमळीचे सांगणे होते. मनमोहन सिंग यांची तेव्हा यथेच्छ टिंगल-टिवाळी करण्यात आली. ‘‘मनमोहन सिंग हे रेनकोट घालून शॉवरखाली आंघोळ करतात’’ असे एक विधान पंतप्रधान मोदी यांनी मागे केले होते. थोडक्यात, मनमोहन सिंग यांना अर्थशास्त्रातले काहीच कळत नाही असे नव्या राज्यकर्त्यांचे म्हणणे पडले. मनमोहन रेनकोट घालून शॉवरखाली बसतील किंवा डोक्यावर छत्री धरून तरण तलावात डुबक्या मारतील, पण त्यांना अर्थशास्त्र व राष्ट्राचे अर्थकारण कळते हे सांगायला आम्हाला संकोच वाटत नाही. देशाचेही तेच मत आहे. 35 वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्यांचा संबंध आहे. वाईट काळात त्यांनी अर्थव्यवस्थेची मशागत केली मान्य करावे लागेल. त्यामुळे सध्याच्या अर्थव्यवस्थेत काही चुका दिसत असतील तर मनमोहन यांना बोलण्याचा अधिकार आहे. मनमोहन यांनी आता नुसते तोंड उघडले नाही, तर घणाघात केला आहे. मोदी सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फटका आज देशाला बसत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीसारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत ठरल्याचे मनमोहन सांगत आहेत. देशाचा विकास दर घसरला आहे, उत्पादन क्षेत्रातील वाढ घसरली आहे व लाखो लोकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. मात्र हे चित्र सरकारला भयावह वाटू नये ही स्थिती धक्कादायक आहे. देशाच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामनबाईंचे कौतुक आधी झाले. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून त्यांच्यावर उधळलेली फुले अद्याप सुकलेली नाहीत, पण सक्षम महिला असणे व देशाचे अर्थकारण रुळावर आणणे यात फरक आहे. आपल्या पहिल्या महिला अर्थमंत्र्यांना आर्थिक मंदी कोठेच दिसत नाही व देशात सर्व आलबेल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

मनमोहन सिंग यांच्या पाठोपाठ नितीन गडकरी यांचे तितकेच टोकदार वक्तव्य आले आहे. सरकार जेथे जेथे हात लावते तेथे तेथे सत्यानाश होत असल्याचा भाला गडकरी यांनी खुपसला आहे. नोटाबंदी व जीएसटी ही या सत्यानाशाची उदाहरणे आहेत, याची आठवणही शिवसेनेने करून दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena attacks government on recession