Loksabha 2019 : नरेंद्र मोदी 'विष्णू' : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

अडवाणी हे पुन्हा बोलते झाले ही आनंदाची बाब आहे. भीष्मांचे मुक्त चिंतन कोणती वावटळ उठवते ते पाहायचे. आडवाणींच्या मुक्त चिंतनाचे स्वागत मोदी यांनी केले आहे. हवा बदलत असल्याचे हे संकेत आहेत, असे या अग्रलेखात म्हटले आहे. चौकशीच्या तलवारी केवळ टांगत्या ठेवून भ्रष्टाचार कसा संपवणार;असा सवाल ठाकरे यांनी केला.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख "विष्णू" केल्यामुळे लोकसभा रणधुमाळीत नवीन वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.

"सामना" च्या अग्रलेखात लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांची भूमिका मांडली, पण विरोधकांत आज आडवाणींसारखा भीष्माचार्यही नाही व मोदींसारखा कृष्णार्जुन नाही. ते विष्णू आहेत. पाच पांडवांचे बळही त्यांच्यात आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे म्हटले होते. त्यावर गदारोळ झाल्यानंतर वाघ यांना भाजप नेत्यांनी तंबी दिली होती. आता उद्धव ठाकरे यांनीच तसा उल्लेख केल्याने निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे. युती होण्या आधी ठाकरे यांनी मोदींवर शेलक्या शब्दात टीकास्त्र सोडल्याची उदाहरणे आहेत. युती झाल्यावर मात्र त्यांनी मोदींचे कौतुक करण्यास सुरुवात केली.,  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'नरेंद्र मोदी माझे मोठे बंधू आहेत', 'ते देशाचे आणि आमचेही नेते आहेत', असे उद्धव म्हणाले होते, आता मोदींचा उल्लेख "विष्णू" केल्याने त्यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.

अग्रलेखात उद्धव म्हणतात की, अडवाणी हे पुन्हा बोलते झाले ही आनंदाची बाब आहे. भीष्मांचे मुक्त चिंतन कोणती वावटळ उठवते ते पाहायचे. आडवाणींच्या मुक्त चिंतनाचे स्वागत मोदी यांनी केले आहे. हवा बदलत असल्याचे हे संकेत आहेत, असे या अग्रलेखात म्हटले आहे. चौकशीच्या तलवारी केवळ टांगत्या ठेवून भ्रष्टाचार कसा संपवणार;असा सवाल ठाकरे यांनी केला.

तसेच या अग्रलेखातून संविधानाचा गळा घोटला जात असल्याची ओरड करणाऱ्या विरोधकांनाही बोल सुनावण्यात आले आहेत. आमची सत्ता आली तर चौकीदारास तुरुंगात टाकू, असे जाहीरपणे बोलणे व त्यानंतरही मुक्त फिरणे हे काही देशात व्यक्तिस्वातंत्र्य संपूर्ण संपल्याचे लक्षण नाही. विरोधकांनी नैतिकता, धैर्य व एकवाक्यता दाखवली तर सत्ताधारी बेबंद वागणार नाहीत. अडवाणी यांनी त्यांची भूमिका मांडली, पण विरोधकांत आज आडवाणींसारखा भीष्माचार्यही नाही व मोदींसारखा कृष्णार्जुन नाही. ते विष्णू आहेत. पाच पांडवांचे बळही त्यांच्यात आहे. त्यामुळेच विरोधकांच्या रथाचे चाक चिखलात रुतले आहे. मात्र त्याचे खापर ते मोदींवर फोडत असल्याचे सांगत ठाकरे यांनी विरोधकांना लक्ष्य केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena chief Uddhav Thackeray called Narendra Modi as Vishnu