
आज सकाळी नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे राजभवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले. राज्यातील जनतेला एकामागून एक धक्के देणाऱ्या राजकीय नाट्याचा अखेरचा अंक मंगळवारी पाहायला मिळाला. अजित पवारांनी ऐनवेळी साथ दिल्याने स्थापन झालेले देवेंद्र फडणवीस सरकार, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडल्याने कोसळले.
मुंबई : महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) सकाळी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही यावेळी उपस्थित होत्या.
आज सकाळी नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे राजभवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले. राज्यातील जनतेला एकामागून एक धक्के देणाऱ्या राजकीय नाट्याचा अखेरचा अंक मंगळवारी पाहायला मिळाला. अजित पवारांनी ऐनवेळी साथ दिल्याने स्थापन झालेले देवेंद्र फडणवीस सरकार, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडल्याने कोसळले. पाठोपाठ सत्ता स्थापण्यास उत्सुक असलेल्या महाविकास आघाडीने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा न गमाविण्यासाठी वेगवान हालचाली करत अधिकृतपणे आघाडीची घोषणा केली आणि लगोलग उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापनेचा दावा केला आहे. एक डिसेंबरला शिवतीर्थावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एक डिसेंबरला शिवाजी पार्कवर उद्धव यांच्या नेतृत्वातील सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची घोषणाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वेळी केली. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने उद्याच सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर राष्ट्रावादीचे बंडखोर नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे बहुमतापर्यंत पोचू शकणार नसल्याची जाणीव होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे फडणवीस सरकारचा कारभार चार दिवसांत उरकला. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या व नवे सरकार अस्तित्वात येण्यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या.