esakal | गरज असेल तिथेच आघाडी, राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

गरज असेल तिथेच आघाडी, राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

गरज असेल तिथेच आघाडी, राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या दहा महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 140पेक्षा अधिक नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुकींची शक्यता गृहीत धरु, मात्र ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याशिवाय मतदान न घेण्याची भूमिका ठेवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.

फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादीने सुरु केली आहे. या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. ज्या महानगरपालिकांवर भाजपचे प्राबल्य आहे, अशा ठिकाणी काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेण्याबाबत मित्र पक्षांशी चर्चा करावी, असेही या बैठकीत ठरवण्यात आले. सर्वच ठिकाणी शिवसेना, काँग्रेसबरोबर आघाडी होईल असे नाही, काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी दोन किंवा तीन पक्षांची आघाडी करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरच प्रामुख्याने चर्चा झाली. पालकमंत्री व मंत्र्यांकडून त्यांच्या जिह्यातली राजकीय परिस्थिती शरद पवार यांनी जाणून घेतली. तसेच निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक नेत्याला एक जिल्हा देण्यात आला. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सर्वच ठिकाणी आघाडी होईल असे नाही, गरज असेल तिथे तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील, स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे मलिक यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: मोहिम फत्ते, अफगाणिस्तान सोडण्याशिवाय पर्याय नव्हता - बायडेन

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हाती घेतलेल्या चौकशींबाबत या बैठकीत चर्चा झाली नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र जयंत पाटील यांनी ‘भाजपची सरकारे नसलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकार ‘ईडी’चा वापर करत असल्याचा पुनरुच्चार आज केला. महाविकास आघाडी सरकार बळकट करण्यासाठी येत्या काही दिवसात महामंडळांवरील नियुक्त्या मार्गी लावण्यात येतील, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.

निवडणुका स्वबळावर

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पक्षाचे प्रवक्ते व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यावर भर देण्याचे बैठकीत निश्चित झाल्याचे सांगितले. जिथे गरज असेल तेथेच तिन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा मार्ग पत्करायचा, असे ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एकेका मंत्र्याकडे एकेका जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्याचे निश्चित केले आहे. तेथील मंत्री त्या -त्या जिल्ह्याकडे लक्ष देईल,असेही ते म्हणाले.

loading image
go to top