महागाई, बेरोजगारी प्रश्नांवर काशीचे भव्य मंदिर हा उतारा नाही, मोदींच्या काशी यात्रेवर शिवसेनेचा टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

modi

"महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर काशीचे भव्य मंदिर हा उतारा नाही"

मुंबई : "अंगावर राख फासून, भगवी वस्त्रे परिधान करून, कपाळास भस्म लावून राज्यकर्त्यांना मंदिरे उभारता येतील, पण राष्ट्र घडवता येणार नाही. महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर काशीचे भव्य मंदिर हा उतारा नाही. मथुरेत मंदिरांचे आंदोलन सुरू करून बेरोजगारी कमी होईल असे कोणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे,” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (pm narendra modi) काशी यात्रेवरुन शिवसेनेने (shivsena) सामनाच्या अग्रलेखातून टोला लगावला आहे.

अंगावर राख फासून, भगवी वस्त्रे परिधान करून राष्ट्र घडवता येणार नाही.

“देशातील प्रत्येक गौरवशाली धार्मिक प्रतीके, ऐतिहासिक स्थळांचा जीर्णोद्धार अशा पद्धतीने व्हावा. पंतप्रधानांनी मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे मनावर घेतले. महात्मा गांधींची तीच भावना होती. पण अंगावर राख फासून, भगवी वस्त्रे परिधान करून, कपाळास भस्म लावून राज्यकर्त्यांना मंदिरे उभारता येतील, पण राष्ट्र घडवता येणार नाही. मंदिरे किंवा धार्मिक स्थळे ही अध्यात्माची ऊर्जा केंद्रे आहेत. धर्म म्हणजे अफूची गोळी हे सत्य आहे. त्यामुळे फक्त ‘अफू’ वाटून लोकांना त्यांचे मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत. ज्या तत्परतेने काशीचा विकास घडवून आणला तीच तत्परता लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दाखवायला हवी. महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर काशीचे भव्य मंदिर हा उतारा नाही. मथुरेत मंदिरांचे आंदोलन सुरू करून बेरोजगारी कमी होईल असे कोणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

..त्याच गंगेत कोरोना काळात हजारो बेवारस प्रेते

“मंदिरांचा जीर्णोद्धार हा वेगळा विषय. ज्या गंगेच्या पात्रात पंतप्रधान मोदी यांनी काल डुबकी मारली त्याच गंगेत कोरोना काळात हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिले. पंतप्रधान म्हणून नव्हे, तर काशीचे खासदार म्हणून मोदी यांनी त्या वेळी तेथे जायला हवे होते. मोदी आजच्या झगमगाटी वातावरणात तेथे गेले, पण गंगा आक्रोश करीत असताना काशीचे खासदार तेथे गेले नाहीत,” अशी टीका शिवसेनेने केली आहे,

“हिंदुस्थानास मांगल्य, ज्ञान, विज्ञान, कला आणि अध्यात्माचा महान वारसा लाभला आहे. शतकापासून या भूमीने महान संस्कृतीचा प्रवाह खळखळत ठेवला आहे आणि ‘वसुधैव कुटुंबकम’च्या संकल्पातून संपूर्ण जगाच्या कल्याणाचा संदेश दिला आहे. आमच्या संस्कृतीची मुळे इतकी घट्ट रुजली आहेत की, अनेक वादळे, हल्लेदेखील ही मुळे नष्ट करू शकले नाहीत. या मुळांतून आपल्या संस्कृतीचा वृक्ष बहरला आहे. देशात आज राजकीय वातावरण बिघडले आहे. राज्यकर्त्यांची मनमानी सुरू आहे. गोंधळाची स्थिती आहे. महामारीने लोकांचे जीवन अशांत केले आहे. अशा वेळी धर्म आणि अध्यात्मच जगण्याची ऊर्जा देत असते. पंतप्रधान मोदींनी काशीत जाऊन गंगेत स्नान केले. त्या गंगास्नानाने त्यांच्या मनाची जळमटे दूर होवोत. विरोधकांविषयीची किल्मिषे नष्ट होवोत आणि काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणेच लोकशाहीच्या मंदिराचाही जीर्णोद्धार होवो,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

हेही वाचा: आमचं हिंदुत्व शेपूट घालणारे आणि पळपुटं नाही - संजय राऊत

काशी यात्रेदरम्यान गंगेत डुबकी मारल्याचे छायाचित्र जगभरात पोहोचले

“पंतप्रधान मोदी यांची काशी यात्रा चांगलीच गाजली आहे. काशी हा मोदींचा मतदारसंघ आहे म्हणून नव्हे, तर मोदी काशीला जाऊन जे धार्मिक, आध्यात्मिक प्रयोग करीत असतात त्याची चर्चा बराच काळ होत असते. मोदी अधूनमधून केदारनाथलाही जात असतात. केदारनाथच्या गुंफेत ध्यानमग्न बसलेल्या पंतप्रधानांची छायाचित्रे मग जगभरात प्रसारित होतात. मोदींची तीर्थयात्रा हा एक प्रकारे राजकीय सोहळाच ठरतो. काशी यात्रेदरम्यान गंगेत डुबकी मारल्याचे छायाचित्र तसेच जगभरात पोहोचले आहे. वाराणसी येथे उभारलेल्या ‘काशी विश्वनाथ धाम’ प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. गंगा नदी आणि प्राचीन विश्वनाथ मंदिराला जोडणारा हा कॉरिडॉर आहे. हे मोदींचे स्वप्न होते. 700 कोटी रुपये खर्च करून मोदींच्या स्वप्नांची पूर्तता झाली आहे, पण काही कोटी रुपये उद्घाटन सोहळा आणि प्रसिद्धीवर उडाले आहेत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉन संसर्गाचा वेग चिंता वाढवणारा; WHO चा सावधानतेचा इशारा

सध्या सगळ्यांच्याच धार्मिक यात्रा राजकीय प्रचारासाठीच

“मोदी यांनी वाराणसी म्हणजे काशीनगरीचा संपूर्ण कायापालट करण्याचे मनावर घेतले आहे. कायापालट करण्यासाठी अनेक जुनी मंदिरे, घरे तोडण्यात आली. अरुंद रस्त्यांचा विस्तार केला. मंदिर परिसराला आकार दिला. मोदी यांनी काशीच्या भूमीवरून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा ‘शंख’ फुंकला. त्यांची ही काशी यात्रा प्रचारासाठीच असल्याची टीका आता होत आहे. सध्या सगळय़ांच्याच धार्मिक यात्रा राजकीय प्रचारासाठीच होत असतात हे देवांनाही ज्ञात असेल. मोदी यांनी त्यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला. औरंगजेबाने आक्रमण करताना मंदिरे तोडली. लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर करून घेतले, तेव्हा छत्रपती शिवाजी राजांची भवानी तलवार या मोगलाईविरुद्ध भिडली. जेव्हा जेव्हा औरंगजेब निर्माण झाला तेव्हा शिवाजी महाराज ठामपणे उभे राहिल्याची आठवण मोदींनी करून दिली. शिवरायांशिवाय हिंदूंच्या लढय़ाचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खास उल्लेख केला हे महत्त्वाचे,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

Web Title: Shivsena Criticized On Pm Narendra Modi Ganga River Kashi Vishwanath Dham Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top