
shivsena.in वरील माहिती गायब; Twitter हँडल हॅक?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह दिलं. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आमचीच शिवसेना खरी म्हणणाऱ्या शिंदे गटाला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळताच शिंदे गटाच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला गेला. आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या जवळ जवळ सर्वच नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल पिक्चरवर धनुष्यबाण हे चिन्ह ठेवलं आहे. एकीकडे हे सुरु असतानाच दुसरीकडे मात्र शिवसेनेचे ट्विटर हँडल हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदे गटाला शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर shivsena.in या साईट वरील माहिती गायब झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावरही ठाकरे व शिंदे गटाचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेच्या महाराष्ट्र व मुंबई ट्विटर हँडल पेजवर असलेली shivsena.in या लिंकवरील संपुर्ण माहिती गायब झाली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर माहिती उपलब्ध नसल्याचा मेसेज समोर येतो. विविध पक्षाच्या ट्विटर हँडलवर त्यांच्या पक्षाची माहिती देणारी लिंक आहे.
त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांची माहिती तत्काळ मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महाराष्ट्र व मुंबई ट्विटर हँडल पेजवरील लिंक हॅक झाल्याची चर्चा सुरु आहे. ही माहिती नेमकी कोणी गायब केली. ही तांत्रिक अडचण आहे की कोणी जाणिवपुर्वक ही माहिती गायब केली आहे याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेले नाही.