नव्या राजकीय समीकरणांची नांदी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

शिवसेनेला मिळणार आघाडीचे बळ?
आजच्या वेगवान राजकीय घडामोडीनंतर सत्तेचा लंबक हा शिवसेनेच्या बाजूने झुकला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज रात्रीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. शिवसेनेने आघाडीशी हातमिळवणी केल्यास केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे राजीनामा देऊ शकतात. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत हे उद्या दिल्लीला जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. काँग्रेसचे आमदारदेखील या अनुषंगाने सोनियांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा नाकारल्याने आता सत्ता समीकरण पूर्णतः बदलणार आहे. भाजपच्या नकारानंतर आता शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी नवी आघाडी समोर येण्याची शक्‍यता वाढली आहे. 

शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरचा दावा कायम ठेवल्याने भाजपसोबतची युती फिस्कटली. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मदतीचा हात पुढे करणार का, याची उत्सुकता आहे. अशा प्रकारच्या नव्या आघाडीचे सूतोवाच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केले आहे. नवी आघाडी लवकरच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करेल, असे सूत्रांचे मत आहे. 

शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्यक्ष सत्तेत जाणार असले, तरी काँग्रेस मात्र सत्तेत सहभागी न होता बाहेरून पाठिंबा देईल, असे सांगण्यात येते. त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांनी पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकला असून, परवानगी मिळाली नाही, तर विधिमंडळात चाळीस आमदारांचा स्वतंत्र गट तयार करण्याचा इशारा या आमदारांनी दिला आहे. 

शरद पवार यांच्याशी शिवसेनेचे नेते संजय राऊत सतत संपर्कात असल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेची जवळीक वाढली आहे. 

जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिल्याचे पवार म्हणत असले, तरी भाजप- शिवसेनेने सत्ता स्थापन केली नाही, तर पर्यायी सरकार देण्याची तयारी राष्ट्रवादीची असल्याचे त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यातच शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपची आवश्‍यकता नाही, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते.

शिवसेनेला काही बंडखोर व अपक्ष आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे त्यांच्यासह संख्याबळ ६४ होत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena ncp congress bjp politics