राहुल गांधी यांचे 'गांधी विचार' देशात पोहोचवायला हवे : शिवसेना

राहुल गांधी यांचे 'गांधी विचार' देशात पोहोचवायला हवे : शिवसेना

मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर यापूर्वी सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेनेकडून आता मात्र कौतुक केले जात आहे. शिवसेनेने सामना संपादकीयमधून राहुल गांधी यांचे कौतुक केले. त्यामध्ये संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा ते राहुल गांधी यांनी दाखवून दिले, असे म्हटले आहे. राहुल गांधी यांचे 'गांधी विचार' देशभरात पोहोचवायला हवे, असेही यावेळी मांडण्यात आले. 

कोरोना व्हायरससह देशातील इतर परिस्थितीविषयी राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी आपले मत मांडत सरकारला सल्ले दिले होते. त्यावर आता शिवसेनेने राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्यात कोरोनासंदर्भात तरी एखादी चर्चा थेट व्हावी, असे हे गांधी विचार ऐकल्यावर प्रत्येकाला वाटत असावे. राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे.

संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा ते राहुल गांधी यांनी दाखवून दिले. त्याचबरोबर अशा घोर प्रसंगी सरकार, तसेच विरोधी पक्षाने काय करावे याबाबत गांधींनी जणू 'चिंतन शिबिर'च घेतले. त्या चिंतनाचा आदर केला तर देशाला फायदाच होईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

तसेच राहुल गांधी यांच्याविषयी काही प्रवाद असू शकतात. तसे ते कोणाविषयी नाहीत? पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याविषयीदेखील आहेत. भारतीय जनता पक्षाचे निम्मे यश हे राहुल गांधी यांच्या प्रतिमाभंजनातून मिळालेले यश आहे व हे भंजन आजही सुरूच आहे, पण 'कोरोना' युद्धात राहुल गांधी यांनी घेतलेल्या संयमी व जागरुक विरोधी पक्षाच्या भूमिकेचे कौतुक करावेच लागेल. देशातील संकटप्रसंगी विरोधी पक्षाने कसे वागावे, काय करावे याची आदर्श आचारसंहिता राहुल गांधी यांनी निर्माण केली आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी कोरोना संक्रमणाचा धोका आधीच ओळखला होता व त्याबाबत ते सरकारला सावध करीत होते. जेव्हा मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यात सगळेच गुंतले होते तेव्हा राहुल गांधी कोरोनासंदर्भात सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत होते. आपल्या देशाला गरज असताना कोरोनाबाबतचे वैद्यकीय सामानसुमान निर्यात करणे थांबवा असे ते वारंवार सांगत होते. पण त्यांचे ऐकायचेच नाही हे सध्याचे सरकारी धोरण आहे. कोरोनाविरुद्धचे युद्ध देशाने एकत्र येऊन लढायला हवे, असे त्यांनी पहिल्या ‘लॉक डाऊन’च्या आधी सांगितले आणि पंतप्रधानांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे ठासून सांगितले अशी आठवण शिवसेनेने करुन दिली आहे.

राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सांगितले की, ‘बाबांनो, ही भांडण्याची वेळ नाही.’ श्री. गांधी पुढे सांगतात ते महत्त्वाचे. अनेक बाबतीत माझे पंतप्रधान मोदींशी मतभेद असू शकतात, पण ही वेळ मतभेद उगाळत, भांडत बसण्याची नाही. कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकदिलाने लढा द्यायला हवा. भांडत बसलो तर आपल्याला यश येणार नाही. श्री. गांधी यांची ही भूमिका सर्वतोपरी देशहिताची, राजकीय शहाणपणाची आहे. पण सध्या शहाणपणाचा ठेका काही मोजक्या लोकांकडे आहे व त्यांना शहाणपणाचे अजीर्णच झाले असल्याने राहुल गांधी काय बोलतात याकडे पाहणे त्यांना कमीपणाचे वाटत असावे अशी टीका शिवसेनेने केली आहे.

देशात ‘लॉकडाऊन’ वाढवले आहे व ‘लॉक डाऊन’ संपल्यावर आर्थिक अराजकाच्या संकटाशी सामना करावा लागेल. त्याबाबत सरकारने काय केलं? राष्ट्र सेवा म्हणून लोकांनी घरी बसावे हे ठीक, पण राष्ट्र सेवा आणि उपासमार एकत्र नांदू शकत नाही. राहुल गांधी यांनी दोन प्रमुख विषयांना हात घातला आहे व ते सुद्धा राष्ट्रहिताशी निगडित आहेत. ‘लॉक डाऊन’ हा उपाय नव्हे, तर ‘पॉज बटन’ आहे. ‘लॉकडाऊन’ उठले की विषाणू परत त्याचे काम सुरू करेल. यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या लवकरात लवकर चाचण्या करायला हव्यात, असे गांधी यांनी सांगितले आहे.

‘लॉकडाऊन’मुळे व्हायरसचा पराभव होत नाही. ‘लॉकडाऊन’मुळे वैद्यकीय सुविधा तयार करण्यासाठी वेळ मिळतो. म्हणून त्यातून बाहेर पडण्याची रणनिती तयार व्हायला हवी, असे विरोधी पक्षाचे नेते गांधी सांगतात. गांधी सांगतात ते शंभर टक्के खरे आहे. फक्त घरी बसून हे संकट दूर होणार नाही, तर वाढणार आहे. केव्हा तरी घराबाहेर पडावेच लागेल. मात्र त्यावेळी काय याबाबतचा कोणताही ठोस कार्यक्रम आज तरी दिसत नाही असं शिवसेनेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com