'माझ्यानंतर उद्धवला साथ द्या', निरोपाच्या भाषणात रामदास कदम भावूक | Ramdas Kadam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Kadam

मंत्री असूनही कोकणसाठी काही गोष्टी करायच्या राहिल्याची खंतही रामदास कदम यांनी व्यक्त केली.

'माझ्यानंतर उद्धवला साथ द्या', निरोपाच्या भाषणात रामदास कदम भावूक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मर्जीतील परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर थेट हल्ले करून चर्चेत आलेले शिवसेनेचे नेते, रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या विधान परिषदेतील निरोपाच्या कार्यक्रमाला परब यांनी आर्वजून हजेरी लावली. त्याचवेळी कदम यांच्या भावना समजून घेण्याची गरज असल्याचा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी परब यांच्या नावाचा उल्लेख करून हाणला. शिवसेनेत सध्या परब आणि कदम यांच्यातील संघर्ष उघड झाल्याने या कार्यक्रमाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.

रामदास कदम यांनी निरोपाचं भाषण अवघ्या सात मिनिटात आटोपलं. आपल्याच नेत्यांसोबत असलेल्या वादामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर यावेळी कदम यांनी केलेलं भाषण महत्त्वाचं ठरलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या भाषणाचा संदर्भ देत त्यांना दु:ख होईल असं कुठलंही काम करू नका असंही रामदास कदम म्हणाले.

रामदास कदम यांनी निरोपाच्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या माझ्यानंतर उद्धवला साथ द्या या वाक्याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या आत्म्याला दु:ख होईल असं काहीही मी करणार नाही. पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना अशी घोषणा करत बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला जन्म दिला. त्याच घोषणेनंतर मी १९७० मध्ये शिवसेनेत काम करायला सुरुवात केली. ५२ वर्षे होत आली. एक शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, आमदार, नामदार अशा अनेक पदांवर काम केलं. मी भाग्यवान आहे ४०-४५ वर्षे शिवसेनाप्रमुखांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.

हेही वाचा: अटकेच्या टांगत्या तलवारीनंतर नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी धाव

कोकणात सध्या असलेली सिंचन व्यवस्था ही फक्त दीड टक्के इतकीच आहे. मी कॅबिनेटमध्ये अनेकदा विषय उचलून धरला, पण त्यात यश मिळालं नाही. सर्वाधिक पाऊस होणाऱ्या कोकणावर सर्वाधिक अन्याय होत असल्याची भावनाही रामदास कदम यांनी बोलून दाखवली. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण दीड टक्के असून सिंचन मात्र ५५ टक्के आहे. याचंच शल्य असल्याचं रामदास कदम म्हणाले.

अनिल परब यांच्याशी झालेल्या वादावर त्यांनी बोलणं टाळलं. ते म्हणाले की, मला पक्षानं पुष्कळ दिलं. मी अधिक बोलणार नाही आज. कधी कधी कुटुंबामध्ये भांड्याला भांडं लागतं. त्याचा विपर्यास करण्याची गरज नाही. मतभेद थोडेसे होतात, ते तात्पुरते असतात. माझा स्वभाव थोडासा भडकणारा आहे, कधी कधी चिडतो. पण दरेकरांनी सांगितल्याप्रमाणे तितका मवाळ देखील आहे. तितक्या जवळ आल्यानंतर माणुस कळतो असंही त्यांनी म्हटलं.

कदम यांच्यासह अरुण जगताप, प्रशांत परिचारक, गिरीष व्यास, भाई जगताप, गोपीकिशन बजोरिया, अमरिश पटेल, सतेज पाटील या आठ सदस्यांचा कालावधी संपला आहे. मात्र, पटेल, पाटील हे पुन्हा विधान परिषदेत आले आहेत. त्यामुळे अन्य सहाजणांसाठी विधान परिषदेत निरोपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विधान परिषदेत दुपारी तीन कामकाजाला सुरवात झाली; तेव्हा निरोपाच्या कार्यक्रमाचे नियोजन झाले. त्यावेळी सभागृहात एकही मंत्री नसल्याने सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्यानंतर सव्वातीन वाजता परब विधान परिषदेत आले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू हेही परिषदेत आले. परंतु गायकवाड आणि कडू काही मिनिटात सभागृहातून निघून गेले. परब बसून राहिले.

Web Title: Shivsena Ramdas Kadam Last Day Speech In Legislative Assembly Cm Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top