
Shivsena Row : 'शिवसेना' व धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळणार का? अॅड. उज्ज्वल निकम म्हणतात...
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय काल निवडणूक आयोगाने घेतला. या निर्णयाबद्दल ठाकरे गटाकडून मात्र नाराजी व्यक्त होत आहे. आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पण त्यांना न्याय मिळणार का, याबद्दल अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिलं आहे.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळणार का? असा प्रश्न राज्यभरात अनेकांना पडला असेल. त्यावरच उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे. निवडणूक आयोगाचा निकाल अंतिम असतो. पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा विषय सर्वोच्च न्यायालयात नेता येऊ शकतो, असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर पुढे काय?
उज्ज्वल निकम म्हणाले, "निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यास उद्धव ठाकरेंना शिवसेनेवरचा त्यांचा अधिकार सिद्ध करावा लागेल. नाहीतर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मान्यच करावा लागेल. पण सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला, तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विचार केला जाऊ शकतो."
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळेल आणि तो निकाल माईलस्टोन ठरेल, असंही उज्ज्वल निकम म्हणाले. शिवाय निवडणूक आयोगाचा निकाल एकनाथ शिंदेंना मानसिक आनंद देणारा आहे, पण तो किती वेळ टिकेल हे सांगता येत नाही, असंही उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.