
Shivsena Row : उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत यावं; शिंदे गटानं ऑफर देत जखमेवर मीठ चोळलं!
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह नुकतंच शिंदे गटाला मिळालं आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांवर सातत्याने टीका केली जात आहे. अशातच आता शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना एक खोचक ऑफर देऊ केली आहे.
ज्यांच्याविरोधात बंड केलं, त्यांनाच आपल्याकडे बोलवत शिंदे गटातले मंत्री संदीपान भुमरे यांनी टोला लगावला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्यभरातल्या शिंदे समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सातत्याने उद्धव ठाकरे व त्यांच्या समर्थकांवर टीका होत आहे. संदीपान भुमरे यांनीही टीका करत आता ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.
पक्षात आता फक्त बाप लेकच शिल्ल राहिल्याची टीका भुमरे यांनी केली आहे. ते म्हणाले, "निवडणूक आयोगाच्या निर्णयाने आम्हाला न्याय मिळाला आहे. या निकालानंतर आता ठाकरे गटाकडे राहिलेले आमदार खासदारसुद्धा आमच्याकडे येतील. त्यामुळे पक्षात फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील. त्यांनीही आता आमच्या पक्षात यावं."
चिन्ह आणि नाव आम्हालाच मिळणार याची आम्हाला खात्री होतीच, असंही भुमरे म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, "हा निकाल बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने आला आहे. धनुष्यबाण आपल्यालाच मिळणार याचा आम्हाला विश्वास होता. कारण ४० आमदार, १३ खासदारांसह १० अपक्ष आमदार आणि अनेक नगरसेवकही बाळासाहेबांची शिवसेनेत होते."