
"२०२४ साठी तयार राहा", संजय राऊतांनी ठोकला शड्डू
कोल्हापूर : शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार यांनी राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे. दरम्यान ते आज आणि उद्या कोल्हापूरात सभा आणि बैठकांसाठी गेले असताना माध्यमांना बोलत होते. २०२४ च्या निवडणुकांसाठी तयार राहा असं अवाहन त्यांनी केलं आहे.
(Sanjay Raut News)
"संभाजीराजेंना आम्ही उमेदवारीसाठी ऑफर केली होती पण त्यांनी ती स्विकारली नाही, तो प्रश्न आता संपला आहे, त्यांच्याविषयी आमच्यात आदर आणि प्रेम आहे तो तसाच राहणार आहे." असं संजय राऊत म्हणाले आहेत.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ते कोल्हापूरला गेले असल्याचं त्यांनी सांगितलं. "२०२४ च्या निवडणुका लढवण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. महाविकास आघाडीने कोणताही जनतेच्या हिताचा निर्णय घेतला तर भाजपाने टीका करण्याचा पवित्रा घेतला आहे पण शिवसेना आणि महाविकास आघाडी ठामपणे पुढे जात आहे" असं ते म्हणाले. शिवसेनेने संभाजीराजेंचा शब्द पाळला नाही यावरून चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेवर बोलताना "चंद्रकांत पाटलांनी चोमडेपणा करून नये" असा टोला लावला आहे.
"आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेतो, तसा आम्ही निर्णय घेतला आणि त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. आम्ही त्यांना विनंती केली पण त्यांनी स्विकारली नाही, सहाव्या जागेचा प्रश्न आता संपला आहे." असं ते संभाजीराजेंना उद्देशून बोलताना म्हणाले. "२०१९ साली शब्द कुणी मोडला हे त्यांनी सांगावं. संभाजीराजे आणि आमच्यात बोलण्याचा त्यांचा संबंध काय? त्यांच्या टीकेला आम्ही उत्तर का द्यायचं?" असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांवर लावला आहे.
आम्ही कोल्हापूरातून संजय पवारांना उमेदवारी दिली आहे. संभाजीराजेंचा आणि आमचा विषय आता संपला आहे. त्याविषयी आम्हाला आता काही विचारू नका असं म्हणत त्यांनी आर्यन खानच्या क्लीनचीट प्रकरणी नवाब मलिकांचे अभिनंदन केले.