पाळणा हलणार का, तो कसा हलेल?; शिवसेनेचे प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

आता महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच गोड बातमी अपेक्षित आहे ती म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार आहे. महाराष्ट्राच्या नशिबी एक स्वाभिमानी सरकार येणार व तसे भाग्य मऱ्हाटी जनतेच्या ललाटी लिहिले असेल तर ती भाग्यरेषा पुसण्याची ताकद कुणात नाही कारण ही भाग्यरेषा भगवी आहे. राज्यात ‘महायुती’चेच सरकार येईल, अशी गर्जना चंद्रकांतदादा पाटील वगैरे भाजप नेत्यांनी केली आहे. त्यांच्या तोंडात साखर पडो.

मुंबई : भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मागील दोन दिवसांपासून वारंवार गोड बातमीचे दाखले देत आहेत. आता ही गोड बातमी म्हणजे नेमकी कोणती सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे लग्न वगैरे ठरले आहे. अर्थात गोड बातम्यांचे कितीही दाखले दिले तरी पाळणा हलणार का? तो कसा हलेल? असा प्रश्न शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

भाजपचं ठरलं! शिवसेनेशिवाय करणार सत्तास्थापनेचा दावा 

भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी युतीबाबत लवकरच गोड बातमी मिळेल असे म्हटले होते. मुख्यमंत्रीपदावर ठाम असलेल्या शिवसेनेने त्यांच्या याच वक्तव्याचा 'सामना'च्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे.

शिवसेनेचं आज ठरणार; शिवसेनेच्या 'वाघां'ची मातोश्रीवर बैठक

शिवसेनेने म्हटले आहे, की आता महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच गोड बातमी अपेक्षित आहे ती म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार आहे. महाराष्ट्राच्या नशिबी एक स्वाभिमानी सरकार येणार व तसे भाग्य मऱ्हाटी जनतेच्या ललाटी लिहिले असेल तर ती भाग्यरेषा पुसण्याची ताकद कुणात नाही कारण ही भाग्यरेषा भगवी आहे. राज्यात ‘महायुती’चेच सरकार येईल, अशी गर्जना चंद्रकांतदादा पाटील वगैरे भाजप नेत्यांनी केली आहे. त्यांच्या तोंडात साखर पडो. कारण सुधीर मुनगंटीवार यांनी ‘गोड’ बातमी मिळेल असा दावा केला आहे. प्रश्न इतकाच आहे की, ते सरकार नक्की कधी येईल व ही ‘महायुती’ की काय ती नक्की कुणाची व कशी, हे दादा वगैरे मंडळींनी सांगितले नाही. भारतीय जनता पक्ष ज्या ‘महायुती’चा विचार करीत आहे ती आकाराने मोठी असली तरी त्यात सामावलेल्या अनेकांचा स्वतःचा एकही आमदार निवडून आलेला नाही. हे सर्व बिन आमदारांचे ‘महामंडळ’ही परवा राज्यपालांना भेटले व त्यांनी सरकार स्थापनेबाबत चिंता व्यक्त केली. ही चिंता राज्याची नसून पुढील सरकारात आपले स्थान काय, यावर जास्त आहे. हे बिन आमदारांचे महामंडळ उद्या दुसरे एखादे सरकार येईल तेव्हा मागचे सर्व विसरून नव्या सरकारात सामील झालेले असेल.

पुन्हा एकदा पवार राजकीय पटलाच्या केंद्रस्थानी

‘मावळते’ अनेक मंत्री चिंतेत आहेत. त्यांनाही चिंता आपल्या सरकारी गाडी, घोडा, बंगला जाण्याची आहे. त्यांची धाकधूक वाढली आहे; पण राज्याची जनता एकमुखाने मागणी करीत आहे की, काही झाले तरी महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा. ज्याच्याकडे गणित असेल त्याने सरकारही बनवावे आणि मुख्यमंत्रीही बनवावा, हे आमचेही मत आहे. पण भ्रष्टाचार आणि अत्याचार करून कोणी राजकारण करणार असेल व औटघटकेच्या सत्तेचा वापर करून ‘फोड झोड’ करणार असेल तर त्या बाटग्यांना जनता सोडणार नाही. बाटगा जोरात बांग देत असतो असा काहीसा प्रकार सत्तास्थापनेच्या निमित्ताने सुरू  झाला आहे. ज्यांचा भारतीय जनता पक्षाशी, हिंदुत्व वगैरे विचारधारेशी काडीचा संबंध नाही असे काही ‘बाटगे’ नव्या आमदारांशी संपर्क करून ‘थैली’ची भाषा करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. हे सर्व मुख्यमंत्री किंवा भाजप नेत्यांच्या आशीर्वादानेच घडत आहे, असा आमचा दावा नाही. पण हे तथाकथित वाल्मीकी जणू राज्य स्थापनेची जबाबदारी आपल्यावरच असल्याच्या थाटात पुढच्या सरकारचे हवाले देत बाटवाबाटवी करीत आहेत. ही राजकीय झुंडशाही महाराष्ट्राच्या, शिवरायांच्या परंपरेस शोभणारी नाही. सरकार स्थापन व्हावे व ते महाराष्ट्राच्या थोर पुरोगामी परंपरेच्या मार्गावरून व्हावे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena targets BJP leader Sudhir Mungantiwar in saamana editorial