शिवसेनेने धनुष्य ताणला... आता गाव तेथे शाखाप्रमुख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

उद्धव साधणार शेतकऱ्यांशी संवाद
शेतकऱ्यांना पीकविम्याचे दावे मिळवून देण्यासाठी शिवसेनेने ग्रामीण भागात मदत केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रांना उद्धव ठाकरे भेटी देणार असून, या वेळी ते शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. यासाठी २२, २३ आणि २४ जूनदरम्यान उद्धव यांचा औरंगाबाद, नाशिक, शिर्डी, असा दौरा आयोजित केला आहे. उद्धव यांच्यासोबत युवासेना नेते आदित्य ठाकरे, उपनेते, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

मुंबई - वर्धापन दिन धडाक्‍यात साजरा केल्यानंतर शिवसेना आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. ग्रामीण भागात शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट रोवण्यासाठी शिवसेनेने महाराष्ट्रभरात एक लाख शाखाप्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्‍त्या येत्या ११ दिवसांमध्ये करण्याचे निर्देश शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेवर आधारित ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ हे अभियान राबवण्यात येत असून, या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रत्येक प्रभागात शाखाप्रमुख, तर ग्रामपंचायतीच्या प्रत्येक वॉर्डमध्ये उप शाखाप्रमुख नियुक्त केले जाणार आहेत. राज्यभरात या अभियानाला सुरवात झाली असून, ग्रामीण भागात १४ ते २७ जुलैदरम्यान हे अभियान राबवण्याच्या सूचना विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणूक युतीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. युती अभेद्य असली, तरी सर्व काही समसमान हवे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात स्पष्ट केले होते. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे असल्यास शिवसेनेच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी शिवसेनेला अधिक प्रयत्न करावे लागणार असून, त्याचीच सुरवात शिवसेनेने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Village Branch Uddhav Thackeray Politics