Babasaheb Purandare : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना पोलिसांकडून अखेरची मानवंदना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना पोलिसांकडून अखेरची मानवंदना

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना पोलिसांकडून अखेरची मानवंदना

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर गेल्या आठवड्यापासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपाचारावेळीच त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे हे चालता बोलता इतिहास होते. सोमवारी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती येथील निवास स्थानी आणले असून नागरिकांची अंत्यदर्शनासाठी गर्दी होत आहे.पर्वती पायथा निवासस्थानी 8 ते 12 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मभुषण आणि महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यातं आलं होतं. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरिक्षक यावेळी उपस्थित आहेत. पोलिसांकडून बाबासाहेब पुरंदरेंना अखेरची मानवंदना देण्यात आली.

बाबासाहेब पुरंदरेंचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पुरंदरेवाड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून वैकुंठ स्माशनाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, बाबासाहेब आज आपल्यात नसलेत तरी इतिहासाच्या पानापानावर ते दिसतील. इतिहास कसा सांगावा, कसा पोहोचवावा याचा ते आदर्श परिपाठ होते. बाबासाहेब आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांचं नातं जिव्हाळ्याचं होतं, बाळासाहेब ज्यांच्या पायाला स्पर्श करायचे अशा मोजक्या लोकांमध्ये बाबासाहेब होते. दोघांनाही इतिहासाचं वेड होतं, बाबासाहेब इतिहास सांगायचे आणि बाळासाहेब इतिहास घडवायचा प्रयत्न करत होते असं म्हणत बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणी संजय राऊत यांनी सांगितल्या.

बाळासाहेब ठाकरेंची अंत्ययात्रा शिवाजी पार्कला पोहचली. तेव्हा एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बाबासाहेब एका खिडकीत उभा होते. जेव्हा अंत्ययात्रा समोर आली तेव्हा भावनाविवश होऊन त्यांनी श्रद्धांजली वाहिली. बाळासाहेबांचा स्मृतीदिन दोन दिवसांवर आला आहे आणि त्याआधीच बाबासाहेबांचं जाणं हा एक योगायोग असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं.

बाबासाहेब पुरंदरेंचे निधन झाल्याची बातमी कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याकडे येण्यासाठी रवाना झाले होते. ते पुण्यात पुरंदरेवाड्यात पोहोचले आहेत. राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला पुष्पहार घालून अंत्यदर्शन घेतले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अंतिम दर्शन घेतले. बाबासाहेबांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आठवणी, काम, लिखाण, साहित्य अनेक पिढ्यांसाठी जिवंत राहिल अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

शतायुषी शिवऋषीला मुकलो - मोहन भागवत

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आपण एका शतायुषी शिवऋषीला मुकल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती निष्ठेने चालवली असेही भागवत यांनी म्हटले. शिवशाहीर बाबासाहेबांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी त्यांचे आयुष्य पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप व प्रेरणा सतत जागृत ठेवील अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

साहित्य, कला क्षेत्रातील अर्ध्वयू गमावला - शरद पवार

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बाबासाहेब आपण अजुन हवे होतात - नितिन गडकरी

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आणि अवघ्या महाराष्ट्राला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती. आणखी करोडो हृदये प्रज्ज्वलित होतील आणि बाबासाहेबांची वाणी त्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वास होता. शेवटी एवढंच म्हणेन, बाबासाहेब आपण अजून हवे होतात अशा शब्दांत नितीन गडकरींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा: बाबासाहेब नेहमी सांगायचे, 'संशोधनातून व्हावी इतिहासाची मांडणी'

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख - छत्रपती उदयनराजे भोसले

इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे : चालता-बोलता इतिहास

बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अवघ्या महाराष्ट्राची हानी - नारायण राणे

ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे ही अवघ्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. बाबासाहेबांना माझी विनम्र श्रद्धांजली.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

loading image
go to top