शिवस्मारकाचे हॉवरक्राफ्टमधून जलपूजन

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 25 डिसेंबर 2016

मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. गिरगाव चौपाटीवरून हॉवरक्राफ्टमधून स्मारक स्थळापर्यंत जाऊन राज्याच्या गड-किल्ल्यांवरील माती आणि प्रमुख नद्यांतील पाणी पंतप्रधानांनी समुद्रात अर्पण केले. या वेळी त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, कलादिग्दर्शन नितीन देसाई उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय उपस्थित होते. स्मारकाच्या ठिकाणी राज्यभरातून आणलेल्या जल आणि मातीचे पंतप्रधानांच्या हस्ते समुद्रात जलार्पण करण्यात आले. पुरोहित श्रीराम देवधर यांनी हा विधी केला.

स्मारकाच्या जलपूजनानंतर बांद्रा-कुर्ला संकुल येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो,' अशी मराठीतून भाषणाला सुरवात केली. 2014 च्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत भाजपने पंतप्रधानपदाची उमेदवारी दिल्यानंतर आपण रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी आलो होतो, अशी आठवण मोदी यांनी करून दिली. वीर, पराक्रमी महापुरुष असलेल्या शिवाजी महाराजांनी भारताच्या इतिहासात सुशासन आणि प्रशासन याचा नवीन अध्याय लिहिला. सुशासनाच्या उदात्त परंपरेला पुढे नेणारे शिवाजी महराज हे जगाच्या इतिहासातील एकमेव बहुआयामी व्यक्‍तिमत्त्व असल्याचे मोदी यांनी या वेळी नमूद केले.

वीर, पराक्रमी महापुरुष असलेल्या शिवाजी महाराजांनी भारताच्या इतिहासात सुशासन आणि प्रशासन याचा नवीन अध्याय लिहिला.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsmarak jalpujan in hawercraft