

solapur
तात्या लांडगे
सोलापूर : बालवयातील मुलींना प्रेम, विवाह व मोठमोठ्या स्वप्नांचे आमिष दाखवून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये सोलापूर शहर-जिल्ह्यात चिंताजनक वाढ होत आहे. १ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ४२३ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना नोंदल्या गेल्या असून, त्यापैकी ६६ मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही.
सोलापूर शहरात २०२५ मध्ये १०६, तर चालू वर्षात ३६ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. त्यापैकी सात मुली अद्याप बेपत्ता आहेत. दुसरीकडे, सोलापूर ग्रामीणमध्ये २०२५ मध्ये २१३ मुलींचे अपहरण झाले होते. यंदा १ जानेवारी ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आणखी ७९ मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी अनेक मुलींचा शोध अजूनही सुरू आहे. यातील काही मुली आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील, तर काही सधन घरातील असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
मुलींना सोशल मीडियातून किंवा ओळखीच्या माध्यमातून प्रेम व लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले जात असल्याचेही दिसून येते. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर सुरुवातीचे चार महिने स्थानिक पोलिस शोधमोहीम राबवितात. त्यानंतर तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग केला जातो. दरम्यान, शोध लागलेल्या अनेक मुली अल्पवयातच गर्भवती झाल्याच्या नोंदीही पोलिसांकडे आहेत.
कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचे अर्ज वाढले
मुलगी शाळा-कॉलेजमध्ये शिकत असताना तिच्या मित्र-मैत्रिणींबद्दल पालक अनभिज्ञ असतात. सध्या आई-वडिलांचा मुलांसोबतचा संवाद हरवला असून, मुला-मुलींच्या वागण्यातील बदल देखील त्यांना समजत नाही. अशावेळी ओळखीतील कोणीतरी तिला खूप मोठी स्वप्ने दाखवितो आणि ‘ती’ त्या मुलासोबत पळून जाते. त्यावेळी ‘ती’ आई-वडिलांचा, समाजातील बदनामीचा देखील विचार करीत नाही. पुढे बालवयात ती आई बनते आणि पुढे किरकोळ कारणातून संसारात वाद निर्माण होतात. २०२१ पासून कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी तरुणींच्या अर्जांचे प्रमाण वाढल्याचे तेथील वकील सांगतात.
प्रेमाच्या आमिषातूनच अल्पवयीन मुलींचे अपहरण
अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर चार महिन्यांत ती सापडली नाही, तर तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे दिला जातो. प्रेम व विवाहाच्या आमिषातून बालवयातील मुलींना पळवून नेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
- धनाजी शिंगाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सोलापूर शहर
अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची स्थिती
सन अपह्रत मुली सापडल्या अद्याप बेपत्ता
२०२५ ३१९ २९७ २२
२०२६ ११४ ७४ ४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.