

solapur city crime
sakal
सोलापूर : येथील कृष्णामाई नर्सिंग होममध्ये सिझेरियनच्या शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच प्रसूत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शस्त्रक्रियेनंतर तीव्र रक्तस्त्राव सुरू असताना तब्बल सहा तास तिच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. ती महिला तडफडत होती; मात्र डॉक्टरांनी तिला पाहिलेच नाही. पल्स आणि ‘बीपी’ कमी कमी होत असताना केवळ नर्सिंग स्टाफकडूनच उपचार सुरू होते. अखेर त्या महिलेचा मृत्यू त्याच रुग्णालयात झाला. प्राथमिक तपासणीत मृत्यू कृष्णामाई हॉस्पिटलमध्येच झाल्याचे दिसते, असा धक्कादायक खुलासा आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी केला आहे.
सोलापुरातील निराळे वस्ती येथील रहिवासी सनी राजेंद्र बावळे यांनी ८ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी अनुजा सनी बावळे यांच्यावर मुरारजी पेठ येथील डॉ. दबडे यांच्या कृष्णामाई नर्सिंग होममध्ये सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीकडे योग्य लक्ष देण्यात आले नाही. तसेच वेळेवर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णाला अश्विनी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र तेथे उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदाराने केली होती. यानुसार महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी दोन्ही रुग्णालयांना नोटीस पाठवून उपचारासंबंधी सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले.
आदेशानुसार आज प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला, पल्स व बीपी कमी झाला, तसेच मेंदूला रक्तपुरवठा बंद झाला, असे आढळले. रुग्णाच्या डोळ्यासमोर अंधारी येऊन ती शॉकमध्ये गेली. सिझेरियननंतर तब्बल सहा तास रुग्ण तडफडत होती; तरीही डॉक्टर रुग्णाला पाहण्यासाठी आले नाहीत. नर्सिंग स्टाफकडूनच उपचार सुरू होते. त्यामुळेच रुग्णाचा मृत्यू झाला. त्या महिलेने अखेरचा श्वास दबडे डॉक्टरांच्या रुग्णालयातच घेतल्याचे प्राथमिक तपासणीत निदर्शनास आल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली.
पोलिसांनी घेतले रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज
डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनुजाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पती व बहिणीने केला आहे. यासंदर्भात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनुजाच्या कुटुंबीयांनी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक तानाजी दराडे पुढील तपास करीत आहेत.
ऑक्सिजन व पल्स चांगले होते
प्रसूत महिलेचे सगळे सिग्नल मॉनिटरवर नॉर्मल दाखवत होते. रात्री दोन वाजेपर्यंत त्यांच्या नातेवाइकांनीदेखील पाहिले आहे. आमचा स्टाफ हा एएनएम झालेला आणि अनुभवी आहे. रक्तस्राव झाल्याचा अंदाज आम्हाला येतोच. ऑक्सिजन व पल्स चांगले होते. तसे काही झाले नाही.
- डॉ. माधुरी दबडे, कृष्णामाई हॉस्पिटल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.