

Solapur sucide
sakal
सोलापूर : पतीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पतीने शनिवारी (ता. २५) रात्री बाराच्या सुमारास पत्नीला मोठ्या मुलीसह तिच्या माहेरी मावशीकडे सोडले. मावशीच्या घरातून विवाहिता मुलीसमवेत काही वेळातच घराबाहेर पडली. त्या दोघींचे मृतदेह होटगी रोडवरील आयकर भवनामागील रेल्वे रुळावर आढळले. रेल्वेच्या धडकेत दोघींचाही जागीच मृत्यू झाला, अशी माहिती विजापूर नाका पोलिसांनी दिली. वर्षा पांडुरंग आधटराव (वय ३३) आणि स्वरा पांडुरंग आधटराव (वय १४, दोघीही रा. सुशील नगर, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत.
सैफूल परिसरातील पांडुरंग आधटराव यांचा विवाह वर्षा वाघमारे यांच्याशी झाला होता. तो डी-मार्टमध्ये कामाला आहे. वर्षा ही पांडुरंगच्या आत्याची मुलगी होती. वर्षाच्या आई-वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. माहेरी आल्यावर त्या नेहरू नगरातील डी.एड. कॉलेजजवळील सुशील नगरमध्ये मावशीकडे राहायच्या. शनिवारी रात्री भांडण झाले आणि पती पांडुरंगने पत्नी वर्षा व मोठी मुलगी स्वराला वर्षाच्या मावशीकडे आणून सोडले. त्यांना सोडून पांडुरंग आधटराव सैफूल येथील आपल्या घरी निघून गेला.
काही वेळाने (मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास) वर्षा व त्यांची मुलगी स्वरा मावशीच्या घरातून बाहेर पडल्या. आसरा ब्रिजजवळून दोघीही रेल्वे ट्रॅकने चालत पुढे निघाल्या. रेल्वे पोलिसांना पहाटे साडेचारच्या सुमारास रुळावर दोन मृतदेह पडल्याचे समजले. त्यांनी खात्री करून विजापूर नाका पोलिसांशी संपर्क साधला आणि हवालदार जी. एस. मणुरे घटनास्थळी पोचले. दोघींचीही ओळख पटवून नातेवाइकांना बोलावून घेतले. बेशुद्धावस्थेतील दोघींनाही रविवारी (ता. २६) सकाळी साडेसातच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आता वर्षाने टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमक्या कारणांचा शोध पोलिस घेत आहेत.
लहान मुलगी झोपली होती
शनिवारी रात्री बाराच्या सुमारास पती-पत्नीचा वाद सुरू होता. त्यावेळी मोठी मुलगी स्वरा जागीच होती. त्यांची दुसरी लहान मुलगी झोपलेली होती. वडील आईला घेऊन तिच्या माहेरी जात असताना मोठी मुलगी स्वराही आईसोबत गेली. आईसोबत स्वराचाही रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.
-------------------------------------------------------------------
‘भरोसा’ सेलकडे तक्रार, तरीही...
डी-मार्टमध्ये कामाला असलेला पांडुरंग व वर्षा यांच्यात सतत वाद होत होते. पती व सासूच्या त्रासाला कंटाळून वर्षाने शहर पोलिस आयुक्तालयातील महिला सुरक्षा कक्षाकडे (भरोसा सेल) काही महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. तेथे पोलिसांनी समुपदेशन करून त्यांच्यातील वाद मिटविला होता; पण त्यानंतरही पती-पत्नीतील वाद सुरूच राहिला, अशी माहिती मयत वर्षाच्या भावाने विजापूर नाका पोलिसांना दिली.
----------------------------------------------------------------------
दोघीही ट्रॅकमध्येच बसून राहिल्या अन्...
रेल्वेच्या धडकेत मायलेकीचा मृत्यू झाला. मयत वर्षाच्या डोक्याला व एका बाजूच्या खांद्याजवळ गंभीर दुखापत झाली होती. तर मुलगी स्वराच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. रेल्वेगाडी आल्यानंतरही त्या ट्रॅकमध्येच बसून राहिल्या असाव्यात, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघींचेही मृतदेह रेल्वे ट्रॅकमध्येच पडलेले होते, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.