Shravan Month : श्रावण १७ ऑगस्टपासूनच!

यावर्षी अधिक श्रावण महिना १८ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत आहे. त्यानंतर १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत निज (शुद्ध) श्रावण महिना आहे.
Shravan Month
Shravan MonthSakal

पुणे - दर तीन वर्षांनी येणारा अधिक महिना यंदाच्या वर्षी आला आहे. मंगळवारपासून (ता. १८) त्याला सुरुवात होत आहे. मात्र अधिक श्रावण महिना असल्याने श्रावणी सोमवारचे उपवास नक्की कधी करायचे? श्रावण महिन्यातील व्रतवैकल्ये कधी करायची? अधिक महिन्यात काय करावे आणि काय करू नये? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ‘शारदा ज्ञानपीठम्’चे पं. वसंतराव गाडगीळ आणि पंचागकर्ते मोहन दाते यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

पहिला श्रावणी सोमवार कधी?

यावर्षी अधिक श्रावण महिना १८ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत आहे. त्यानंतर १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत निज (शुद्ध) श्रावण महिना आहे. त्यामुळे पहिला श्रावणी शुक्रवार हा १८ ऑगस्टला, तर पहिला श्रावणी सोमवार २१ ऑगस्टला आहे. आपल्याकडील प्रदेशात श्रावणाचे आठ सोमवार नाहीत.

उपवास दोन्ही महिन्यांत करायचा का?

श्रावण अधिक असल्याने श्रावण महिन्यात केली जाणारी श्रावणी सोमवार, मंगळागौर, वरदलक्ष्मीव्रत आदी सर्व वारव्रते निज महिन्यात म्हणजेच १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत करावीत. अधिक महिन्यात करू नयेत.

अधिक महिना का येतो?

सौरवर्ष आणि चांद्रवर्षाच्या कालगणनेत फरक असल्याने सौरवर्षाप्रमाणे चांद्रवर्षाचे १२ महिन्यांचे ३६५ दिवस न भरता ते ३५४ भरतात. चांद्रवर्षाचे दिवस व सौरवर्षाचे दिवस यांचा ताळमेळ घालण्यासाठी साधारणतः दर तीन वर्षांनी म्हणजेच सुमारे साडेबत्तीस महिन्यांनी एक चांद्रमास दोनदा मोजतात आणि त्यालाच ‘अधिक महिना’ असे म्हणतात. त्यालाच ‘मल मास’ आणि ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हणतात.

या महिन्यात अनारसा किंवा तत्सम सच्छिद्र पदार्थांचे ‘तीस-तीन’चे (तेहत्तीस) वाण दिले जाते. चांगल्या कामांचे संकल्प केले जातात. हा संपूर्ण महिना भगवंताच्या चिंतनामध्ये, भजनामध्ये, स्मरणामध्ये घालवावा, असे पं. वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले.

अधिक महिन्यात काय करावे?

अधिक महिन्यात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत. ग्रहण श्राद्ध, जातकर्म, नामकर्म हे संस्कार करावेत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध, नित्यश्राद्ध करावीत. गृहारंभ, वास्तुशांती, संन्यास ग्रहण, विवाह, उपनयन, नवीन देव प्रतिष्ठा करू नये. मात्र साखरपुडा, बारसे, डोहाळजेवण, जावळ, लौकिक गृहप्रवेश, नवीन वाहन-वास्तू खरेदी, नवीन व्यवसाय सुरु करणे आदी गोष्टी करता येतात, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com