esakal | ताकदीने न लढलेला काँग्रेस | Election Results
sakal

बोलून बातमी शोधा

Shrimant Mane write Article about Congress and vidhansabha election

लोकसभेतल्या दारुण पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ, खिळखिळे पक्षसंघटन, मित्रपक्षाने रणांगणात उडी घेताना दाखविलेला आक्रमकपणा आणि जिद्दीची उणीव, स्टार प्रचारकांची यादी भलेही चाळीस जणांची तरी बहुतेकांची प्रचाराकडे पाठ, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांची गैरहजेरी; राहुल गांधींची नावापुरती हजेरी, पैसा व अन्य साधनांचा वाणवा अशा कितीतरी प्रतिकूल बाबी.

ताकदीने न लढलेला काँग्रेस | Election Results

sakal_logo
By
श्रीमंत माने

राजकारणात प्रतिकूलता काय असते किंवा असावी, याबद्दल अनुभव घ्यायचा तर राजकीय अभ्यासकांनी विधानसभा निवडणुकीत बुडत्या जहाजाचे सुकाणू ज्यांच्या हाती सोपवले ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना अवश्य् भेटावे. निवडणुकीच्या महिनाभर आधी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली. त्यांची भूमिका खरेतर क्रिकेटमधल्या नाइट वॉचमनसारखी वाटली. जोडीला कार्याध्यक्ष नियुक्ता केलेले पाचही जण त्यांच्याच मतदारसंघात अडकून पडले. परिणामी, एकांडे शिलेदार बनून थोरात आणि त्यांचे साथीदार जणू हरलेली लढाई लढले.

अनुकूलतेच्या पारड्यात निवडक नेत्यांचे मतदारसंघ सोडले तर काहीच नाही अन्‌ दुसऱ्या बाजूला कल्पनेपलिकडे विपरीत स्थिती. पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे विरोधी पक्षनेत्यांपासून अनेक दिग्गज, माजी मंत्री पक्ष सोडून गेले. लोकसभेतल्या दारुण पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ, खिळखिळे पक्षसंघटन, मित्रपक्षाने रणांगणात उडी घेताना दाखविलेला आक्रमकपणा आणि जिद्दीची उणीव, स्टार प्रचारकांची यादी भलेही चाळीस जणांची तरी बहुतेकांची प्रचाराकडे पाठ, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांची गैरहजेरी; राहुल गांधींची नावापुरती हजेरी, पैसा व अन्य साधनांचा वाणवा अशा कितीतरी प्रतिकूल बाबी. तरीही, पक्ष नुसताच लढला नाही तर गेल्या वेळेपेक्षा थोड्या का होईना अधिक जागा जिंकल्या.

राधाकृष्ण विखे पाटलांच्या नगर जिल्ह्यात यशाचा लंबक पक्षाकडे झुकविला. विदर्भात गेल्या वेळेपेक्षा जवळपास दुप्पट जागा मिळविल्या. तो आलेख थोडा आणखी उंचावला असता किंवा मुंबईत स्थिती सुधारली असती, तर कदाचित निकाल आणखी वेगळा असता. 

सगळीकडे चर्चा होती, ती काँग्रेसने लढाईआधीच मैदान सोडल्याची. त्यावर पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे हे, की भाजपकडे जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा जनमानसावर प्रभाव असलेले प्रचारक होते, ती अनुकूलता काँग्रेसच्या वाट्याला नव्हती. किंबहुना, शरद पवारांसारखे मास अपील असलेले कोणी नेतेही नव्हते. त्यामुळे, उगीचच ताकदीबाहेरच्या प्रयत्नाऐवजी मर्यादा ओळखून आपापल्या जागांवर, मतदारसंघातच लक्ष घालण्याचे व्यवहारी धोरण स्वीकारले. त्यामुळेच विदर्भात सर्वाधिक 19, पश्चिलम महाराष्ट्रात 13, मराठवाड्यात 8, उत्तर महाराष्ट्रात पाच, मुंबईत चार तर कोकणात एक जागा जिंकता आली. याचा अर्थच असा, की लोक काँग्रेसला मते देण्यासाठी उत्सुक होते. पक्षच ताकदीने लढला नाही. खरेतर काँग्रेसचे पक्षसंघटन संगमनेरभोवती केंद्रित आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे थोरातांचे भाचे. पक्षाच्या मर्यादित; परंतु कौतुकास्पद यशात युवक काँग्रेसच्या प्रयत्नांचा वाटा मोठा आहे. सोशल मीडियापासून ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानातही हा युवा जोश प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न तांबेंनी केला. अधिकाधिक जागा युवकांना देण्याचा आग्रह पक्षाकडे धरला. त्यात यशही आले. नागपूरच्या राजू पारवे यांच्यापासून ते कोल्हापूरच्या ऋतुराज पाटलांपर्यंत किमान दहा तरुण आमदार म्हणून विधानसभेत पोचले. 

घडले, बिघडले
लोकसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे खचलेले मनोधैर्य 
विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, अमरीश पटेल आदी दिग्गजांचे पक्षांतर 
खिळखिळे पक्षसंघटन, कार्यकर्त्यांमध्ये मरगळ, यामुळे राष्ट्रवादीसोबत दुय्यम भूमिका घेत लढाई 

भाजपच्या तुलनेत पक्षसंघटन, संसाधने याबाबत कमतरता. नेत्यांमध्ये परस्पर अविश्वाेसाचे वातावरण 

विदर्भात पक्षाल अधिक संधी, हे ओळखून व्यूहरचना करण्यात अपयश. मुंबईत दुफळीचा फटका