महाराष्ट्राच्या शिवारात घुमतो आहे गटशेतीचा नारा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 December 2020

देशभर शेतकऱ्यांच्या समस्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अन्नदाता शेतकऱ्याचे नुकसान कसे कमी करता येईल, विविध पातळ्यांवर त्याची फसवणूक कशी टाळता येईल याबाबत अनेक दावे, प्रतिदावे समोर येत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या शिवारात गटशेतीचा नारा घुमत आहे.

पुणे - देशभर शेतकऱ्यांच्या समस्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अन्नदाता शेतकऱ्याचे नुकसान कसे कमी करता येईल, विविध पातळ्यांवर त्याची फसवणूक कशी टाळता येईल याबाबत अनेक दावे, प्रतिदावे समोर येत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या शिवारात गटशेतीचा नारा घुमत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गटशेतीचा विचार शिवाराशिवारांत रुजवण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहे. निमित्त आहे प्रधानमंत्री कृषी कौशल विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेद्वारे राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र कृषी प्रशिक्षण उपक्रमाचे. 

डिसेंबर २०१८ पासून राज्यातील २३ जिल्ह्यांत सव्वातीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग राहिलेल्या ‘गटशेती प्रवर्तक’ प्रशिक्षण कार्यक्रमाचा आता शेवटचा टप्पा पुणे, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांत सुरू आहे. १२१ महसुली मंडलांतर्गत २४२०० शेतकऱ्यांची नोंदणी या प्रशिक्षण उपक्रमांसाठी झालेली आहे. भारतीय कृषी कौशल्य परिषद (अस्की), महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था (एमएसएसडीएस) यांच्या माध्यमातून ‘गटशेती प्रवर्तक’ प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी सिमेसिस लर्निंग एलएलपी (एसआयआयएलसी) या संस्थेवर, तर देखरेख आणि संनियंत्रणाची जबाबदारी पॅलेडियम इंडिया 
यांची आहे. 

राज्यातील वन्यप्राणी कोरोना निगेटिव्हच, जंगल भ्रमंती सुरू झाल्यानंतर नेमकी कशी घेतली जातेय प्राण्यांची काळजी?

‘ग’ गटाचा, ‘ए’ एकीचा
दोनदिवसीय प्रशिक्षणानंतर संबंधित प्रशिक्षणार्थी शेतकरी गावागावांत आयोजित जोड कार्यक्रमांतून गटशेतीचे महत्त्व समजून घेत आहेत. गटाची मोट कशी बांधावी, गटाचे उद्देश कशा प्रकारे निश्‍चित करावेत, गटाचे प्रमुख पीक कोणते निवडावे आणि त्या पिकाच्या माध्यमातून कोणता व्यवसाय उभारता येईल, अशा विविध विषयांवर जोड कार्यक्रमांतून शेतकरी विचारमंथन करत आहेत. यासाठी सर्टिफाइड ट्रेनर, परिसरातील यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, अभ्यासू शेतकरी, कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठांतील तज्ज्ञ यांचेही मार्गदर्शन या प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना मिळत आहे. एकट्याने शेती व्यवसायाचे नियोजन करण्यापेक्षा गटाने जर व्यापक नियोजन केले, तर शेती पिकविण्याबरोबरच शेतीमाल पुरवठा साखळीतील नव्या वाटा गवसू शकतात, हा विश्‍वास या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये बळ धरू लागला आहे. आजवर शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी २३ जिल्ह्यांतून २२३८ हून अधिक इच्छाप्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. यामधून ६१ शेतकरी उत्पादक कंपन्यांची आणि १००हून अधिक शेतकरी गटांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

लसीकरणाची शिक्षकांवरच जबाबदारी ! लसीकरणावेळी आधार अन्‌ पॅनकार्डची सक्‍ती

गटशेतीचे योद्धे सेवेत
कोविड-१९च्या पार्श्‍वभूमीवर या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींची आरोग्यसुरक्षा राखण्याच्या उद्देशाने सर्व आरोग्यसुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे. १३० सर्टिफाइड ट्रेनर, १२१ मंडल समन्वयक, ५०हून अधिक केंद्रीय व जिल्हा समन्वयक, कृषी विभागाचे तालुका व जिल्हा कार्यालयांतील अधिकारी, परिसरातील गटशेतीचे पुरस्कर्ते शेतकरी व व्यावसायिक अशी गटशेती योद्ध्यांची फौजच गटशेतीच्या प्रसारासाठी शिवाराशिवारांत योगदान देत आहेत.

गावातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणारा हा प्रकल्प आहे. गटशेती हा चांगला विषय आमच्या पर्यंत या योजनेतून पोहोचला. भविष्यात परिसरातील तरुण शेतकऱ्यांना एकत्र आणून पूरक व्यवसाय करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. 
- अमर माने, माणिकवाडी मंडल, जि. सांगली

गटशेती प्रवर्तक म्हणून आम्हाला सरकारी प्रशिक्षण मिळाले असून, शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारे हे पहिलेच प्रमाणपत्र असणार आहे. मी स्वतः १४० महिलांचे मिळून १४ महिला बचत गट चालवते. महिलांचा शेतकरी बचत गट तयार करण्याचा मानस आहे. आम्ही शेतीपूरक व्यवसाय करत आहोत. या प्रशिक्षणामुळे शेती व्यवसायाला बळकटी येणार आहे.
- सुरेखा जाधव, काऱ्हाटी, ता. बारामती, जि. पुणे

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: slogan of group farming circulating suburbs of Maharashtra