

Ujjwala Yojana beneficiaries tears in eyes
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : महिलांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे, गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांची आरोग्यमानता सुधारून तिचे सक्षमीकरण करावे म्हणून केंद्र शासनाने २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली. दरवर्षी किमान नऊ गॅस सिलिंडरसाठी त्यांना प्रत्येकी ३०० रुपयांची सबसिडी सुरू केली. मात्र, सद्य:स्थितीत गावाकडील उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थींसह सर्वच महिलांना ४५ ते ५० दिवसांनंतर सिलिंडर मिळणार असल्याने त्यांना पुन्हा चुली पेटवाव्या लागल्या आहेत.
प्रत्येक घरगुती गॅस ग्राहकाला एका वर्षात १४.२ किलो वजनाचे १२ अनुदानित गॅस सिलिंडर मिळतात. पाच किलोचे सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी ही मर्यादा एका वर्षासाठी ३४ सिलिंडरची आहे. मात्र, सध्या इराक-इराण-अमेरिकेतील युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा भासू लागला आहे. पूर्वी उज्ज्वला योजनेसह अन्य कुटुंबाला दरमहा किमान एक गॅस सिलिंडर मिळत होते, पण आता दीड महिन्यानंतर सिलिंडर मिळणार असल्याने मोठे कुटुंब असलेल्यांना विशेष: ग्रामीणमध्ये चुली पेटवून स्वयंपाक करावा लागत आहे. आता पुन्हा ‘ती’च्या डोळ्यात धूर पहायला मिळत आहे. गावागावातील लोक उन्हाच्या तडाख्यात सरपणाच्या शोधात बाहेर पडू लागले आहेत. गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत अशीच स्थिती राहील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच
३० जुलै २०२४ व ४ सप्टेंबर २०२४ अशा दोनवेळा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भात शासन निर्णय निघाले. त्यानुसार राज्यातील उज्ज्वला गॅस योजनेच्या ५२ लाख १६ हजार लाभार्थींसह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणे अपेक्षित होते. दीड वर्षात या योजनेतील लाभार्थींना एकही सिलिंडर मोफत मिळालेले नाही.
घरगुती गॅस सिलिंडरची मागणी वाढल्याने अडचण
सोलापूर जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजनेचे सुमारे एक लाख ७० हजार लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी देखील बुकिंगचे नियम सारखेच आहेत. घरगुती गॅस सिलिंडरची मागणी वाढल्याने सध्या दोन सिलिंडर बुकिंगमधील अंतर शहरी भागात २५ दिवस आणि ग्रामीणमध्ये ४५ दिवस निश्चित करण्यात आले आहे.
- ओंकार पडोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर शहर
सोलापुरातील ‘उज्ज्वला’ची स्थिती
एकूण लाभार्थी
१.७० लाख
दरवर्षी अपेक्षित गॅस सिलिंडर
१२
दरवर्षी ‘सबसिडी’चे सिलिंडर
९
आता मिळणारे सिलिंडर
७ ते ८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.