केवळ भिकाऱ्यांना दोष कशाला : उच्च न्यायालय

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 25 July 2020

रस्त्यावरील भिकारी मास्क न वापरता लोकांच्या जवळ येतात, सुरक्षित अंतर ठेवत नाहीत आणि त्यांच्यामुळे कोव्हिड १९ चा संसर्ग वाढत आहे, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

मुंबई - सुसंस्कृत लोकदेखील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सुरक्षा तत्त्वांचे पालन करीत नाहीत, मग केवळ भिकाऱ्यांनाच दोष कशाला, असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी उपस्थित केला.

रस्त्यावरील भिकारी मास्क न वापरता लोकांच्या जवळ येतात, सुरक्षित अंतर ठेवत नाहीत आणि त्यांच्यामुळे कोव्हिड १९ चा संसर्ग वाढत आहे, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. पुण्यातील नागरिक ज्ञानेश्‍वर दारवतकर यांनी ॲड. शेखर जगताप यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये आज सुनावणी झाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनेक महिला, लहान मुले बेशिस्तपणे भीक मागत असतात, त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक संभवतो. तरी राज्य सरकारने यावर योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी याचिकादाराने केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र संपूर्ण देश कोरोनामुळे त्रस्त झाला आहे आणि कठीण प्रसंगातून जात आहे. केवळ भिकाऱ्यांना दोष कशाला द्यायचा, असा प्रश्‍न खंडपीठाने याचिकादाराला केला. शिकलेले सुसंस्कृत लोकही नियमांचे पालन करीत नाही, मग फक्त भिकाऱ्यांना दोष देणे चूक आहे, त्यामुळे संवेदनशील भूमिका घ्या, असे खडे बोल न्यायालयाने ऐकवले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने याचिकेत उपस्थित मुद्द्यांवर खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी ता. १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

(Edited by : Kalyan Bhalerao)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: social distance Why only the beggars are to blame says Mumbai High Court