वाईनबद्दलचा निर्णय दुर्दैवी, राज्याला कुठे घेऊन जाणार - अण्णा हजारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anna-Hazare

केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

वाईनबद्दलचा निर्णय दुर्दैवी, राज्याला कुठे घेऊन जाणार - अण्णा हजारे

महाराष्ट्रात राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्यात येत असल्याचं भाजपने म्हटलं आहे. आता यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही सरकारचा निर्णय महाराष्ट्रासाठी दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे. तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय ह्या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे.

सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देण्यासाठी सरकारने प्राधान्य देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी आहे असल्याचं म्हणत अण्णा हजारे यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.

हेही वाचा: 'सगळ्यात आधी राज ठाकरेंनी वाईन शॉप सुरू करायला सांगितलं'

अण्णा हजारे यांनी म्हटलं की, वास्तनिक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते. शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमी भाव द्यायला हवा. पण त्याकडे रीतसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुली विक्री करून एक वर्षात 1 हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

20 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या आणखी एका निर्णयात याच सरकारने आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के केलेले आहे. उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करून हे मद्य स्वस्त करण्यात आले. यातून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल आणि सरकारला मिळणारा महसूल 100 कोटीवरून 250 कोटीवर जाईल असा विचार सरकारने केला असल्याचे समजते. याचाच अर्थ लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास दिसून येत असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.

Web Title: Social Worker Anna Hajare Criticize State Govt Over Permission To Wine In Supermarket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtraanna hazare
go to top